शैक्षणिक

संगणक टायपिंग व लघुलेखक प्रवेशातील फसवणूक खपवून घेणार नाही – नंदकुमार बेडसे

 

सांगोला :

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या संगणकीय टंकलेखन परीक्षा एप्रिल २०२४ साठी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त संस्थांमधून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्या मान्यताप्राप्त संस्थेचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेले इ-प्रमाणपत्र व त्यावरील संस्थेचे नाव व पत्ता याची खात्री करुनच प्रवेश घ्यावा,अन्य नियमबाह्य संस्थांमधून संगणकीय टायपिंगसाठी प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांनी आपली फसवणूक करुन घेऊ नये.संगणक टायपिंग व लघुलेखक प्रवेशातील फसवणूक खपवून घेणार नाही तसेच अनधिकृत प्रवेश देणार्‍या संस्थांवर गुन्हे नोंदविणार,असा कडक इशारा परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेंडसे यांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेतर्फे राज्यभरात जीसीसी व टीबीसी संगणकीय टायपिंग परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातात. यामध्ये मराठी,हिंदी,इंग्रजी या मिनिट गतीच्या परीक्षा असतात. प्रत्येक विषयासाठी सहा महिन्यांचा हा कोर्स असून प्रती विषय ६ हजार ५०० रुपये इतकी फी आकारली जाते. एकाहून अधिक विषय घेतल्यास प्रति विषय अशी फी आकारण्यात येते. त्याचबरोबर लघुलेखक परीक्षाही परिषदेमार्फत घेतल्या जातात,अशी माहिती डॉ.बेंडसे यांनी दिली.

आमची संस्था मान्यताप्राप्त असून आमच्याकडे प्रवेश घ्या व निश्चित राहा,आमच्याकडे पण,शासनाची परवानगी आहे, अशा प्रकारची खोटी व दिशाभूल करणारी माहिती देऊन अनेक विद्यार्थ्यांना फसविण्याच्या घटना समोर आल्या आहेत.तसेच पास करुन देण्याची हमीही कांही संस्था चालक देतात व अधिक पैसे घेऊन विद्यार्थ्यांची दिशाभूल करतात. या दुष्टचक्रात विद्यार्थ्यांनी व पालकांनी पडू नये,खोट्या अमिषाला बळी पडू नये,असे आवाहन डॉ.नंदकुमार बेडसे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यावर्षीपासून प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक विषयातील सर्वाधिक गुण मिळविलेल्या पाच विद्यार्थ्यांची नांवे जाहीर करुन त्यांचा सत्कार करण्याचा उपक्रम जाहीर केला आहे. भविष्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून जीसीसी,टीबीसी संगणकीय टायपिंग व लघुलेखन विषयामध्ये सकारात्मक बदल करण्याचा मानस जाहीर केला. शिवाय,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आता परिक्षेत बसविणाऱ्या अनधिकृत संस्था व विद्यार्थी यांचेवर करडी नजर ठेवून आहे.त्यामुळे, कोणत्याच मान्यताप्राप्त संस्था चालकांनी नियमबाह्य कामे करुन नियमबाह्य विद्यार्थी परीक्षेस घेऊ नयेत,तसे दिसून आल्यास यापुढे कारवाईसाठी तयार राहावे,असा सूचक इशाराही डाॅ.नंदकुमार बेंडसे यांनी दिला आहे.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button