शैक्षणिक

सांगोल्यातील विज्ञान महाविद्यालय आता, “डाॅ.गणपतराव देशमुख महाविद्यालय” म्हणून ओळखले जाणार

 

सांगोला :

           सांगोला तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर ठरलेले सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,विज्ञान महाविद्यालय आता यापुढे, “डाॅ.गणपतराव देशमुख महाविद्यालय” म्हणून ओळखले जाणार असून नांवातील बदलाबाबत शासनाकडील उच्च शिक्षण विभाग व सोलापूर विद्यापीठाकडून तसे मान्यता पत्रही प्राप्त झाले असल्याची माहिती शेकापचे युवा नेते डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी दिली.

सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य कुटूंबातील होतकरु विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणीच उच्च शिक्षण घेता यावे,या उदात्त हेतूने शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा तालुक्याचे भाग्यविधाते डाॅ.गणपतराव देशमुख यांनी आपल्या तत्कालीन सहकारी कार्यकर्त्यांच्या मदतीने सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन या संस्थेअंतर्गत न्यू इंग्लीश स्कूल व विज्ञान महाविद्यालय सुरु केले. आजमितीला ही शैक्षणिक संस्था सांगोला तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर संस्था म्हणून नांवाजलेली असून स्व.गणपतराव देशमुख यांचे कार्याचा आदर्श सतत स्मरणात रहावा,या उद्देशाने विद्यमान संस्थाचालकांनी विज्ञान महाविद्यालयाला “डाॅ.गणपतराव देशमुख महाविद्यालय” असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठविला होता.

विज्ञान महाविद्यालयाचे नावात बदल करण्याबाबतचा सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचा प्रस्ताव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर यांनी शिफारशीसह शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठविल्यानंतर, शासनाकडून वरीलप्रमाणे “डाॅ.गणपतराव देशमुख महाविद्यालय” असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आली असून विज्ञान महाविद्यालय आता, २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून “डाॅ.गणपतराव देशमुख महाविद्यालय” म्हणून ओळखले जाणार आहे.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button