शैक्षणिक

BREAKING NEWS : सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहारना २५ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

 

 

सोलापूर :

                    सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २५ हजार रुपयाची लाच घेताना आज (सोमवारी) सायंकाळी रंगेहात पकडले असून किरण लोहार यांच्या सोबत एका लिपिकासही यावेळी ताब्यात घेण्यात आल्याने ही वार्ता समजताच, जिल्हा परिषद वर्तूळातच नव्हेतर, संपूर्ण जिल्ह्यातच खळबळ उडाली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा पदभार घेऊन किरण लोहार यांना नुकतेच १३ महिने झाले होते. मात्र, प्राथमिक शिक्षण विभागाचे त्यांचे कामकाज हे कायमच वादग्रस्त राहिले असून त्यांच्याकडील कोणतीही फाईल वजन ठेवल्याशिवाय पुढे सरकतच नाही,अशा तक्रारी वारंवार ऐकण्यास मिळत होत्या. त्यांच्या या काम करण्याच्या पध्दतीमुळे व लाचखोरी स्वभावामुळेच अखेर, त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा सोमवारी हातोडा पडला.

या प्रकरणातील तक्रारदार यांची उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी या ठिकाणी स्वयं अर्थसहाय्य शाळा असून त्यांच्या यूआयडीवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदार यांनी अँटी करप्शन विभागाशी संपर्क साधून याबाबत तक्रार केली. त्यानुसार, सोमवारी ३१ तारखेला सायंकाळी पावणेसहा वाजता जिल्हा परिषदेच्या त्यांच्या कार्यालयातच त्यांना २५ हजार रुपये घेतल्याने रंगेहात पकडण्यात आले.

रविवारी “राज्यस्तरीय पुरस्कार” अन् सोमवारी लाच घेताना अटक – पुरस्कारावरही प्रश्नचिन्ह ?      

विशेष बाब म्हणजे,प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना रविवारी ३० तारखेलाच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत “राज्यस्तरीय पुरस्कार” मिळाला होता आणि लगेच त्याच्या दुसर्‍याच दिवशी त्यांना लाच घेताना पकडले जाते, रविवारी “राज्यस्तरीय पुरस्कार” अन् सोमवारी लाच घेताना त्यांना अटक होते, हा किती दैवदुर्विलास म्हणायचा ? परंतु, त्यांच्या या लाच घेण्याच्या प्रवृत्तीमुळे आता त्यांच्या या पुरस्कारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button