जेष्ठ समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित

 

नवी मुंबई :

जेष्ठ निरुपणकार व जेष्ठ समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून गणल्या जाणार्‍या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.शाल, मानपत्र व २५ लाख रुपयांच्या धनादेशासह सन्मानचिन्ह देत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेसह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. राज्य सरकारचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार हा कांही दिवसांपूर्वी जेष्ठ समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर करण्यात आला होता.त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रायगडमधील रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

दासबोध व श्री सदगुरु चरित्रच्या माध्यमातून समाज घडवण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी हे प्रदीर्घ काळापासून करत आहेत. त्यांचे पिताश्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून त्यांनी हा वारसा घेतला.श्रवण बैठकांच्या माध्यमातून अध्यात्म आणि समाज परिवर्तनाचे कार्य त्यांच्याकडून गेली अनेक वर्षे सुरु आहे. दासबोधावरील श्रवण बैठका महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात होत आहेत. याशिवाय देशातील सर्व राज्ये आणि जगातील बहुतांश देशात हे कार्य सुरु आहे. अध्यात्म क्षेत्रात कार्यरत असतानाच सामाजिक कार्यात आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा मोठा वाटा आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन करण्याचा मोठा उपक्रम हाती घेतला.याशिवाय रक्तदान शिबिर,स्वच्छता अभियान, स्मशानभूमी आणि कब्रस्थानांची स्वच्छता,विहिरींमधील गाळ काढून स्वच्छ करणे यासह अनेक सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार आहे.महाराष्ट्र भूषण सोहळ्याच्या या कार्यक्रमासाठी भर उन्हातही खारघर येथे अथांग जनसमुदाय जमलेला होता.
———————————————————————