महाराष्ट्र

ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रलंबित प्रश्न महायुती सरकारने लावला मार्गी

सांगोला तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी जल्लोष करत आमदार शहाजीबापू यांचे मानले आभार

सांगोला :

१४ वर्षापूर्वी नियुक्ती झाल्यापासून तुटपुंज्या कमिशनवर काम करणार्‍या ग्रामरोजगार सेवकांनी आपल्याला मानधन मिळावे,अशी सरकारकडे वारंवार मागणी केली होती.त्यांच्या या मागणीला अखेर यश आले असून ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रलंबित प्रश्न महायुती सरकारने नुकताच मार्गी लावल्याने सांगोला तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी जल्लोष करत महायुती सरकारचे तसेच आमदार शहाजीबापू यांचे आभार मानले.

  महाराष्ट्र राज्यातील ग्रामरोजगार सेवकांनी २००७ साली नियुक्ती झाल्यापासून तुटपुंज्या कमिशनवर काम केले.नियुक्ती झाल्यापासून  ग्रामरोजगार सेवकांनी आपल्याला मानधन मिळावे,अशी सरकारकडे वारंवार मागणी केली होती.शेकडा ७५ पैसे,२ रुपये २५ पैसे अशा अल्प कमिशनवर त्यांनी काम केले. त्यानंतर २०१४ साली ६ टक्के ,४ टक्के व २.२५ टक्के कमिशन देण्यात येत होते.ग्रामरोजगार सेवकांची मागणी लक्षात घेता, राज्यातील महायुती सरकारच्या ३० सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत २८ हजार ग्राम रोजगार सेवकांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ग्रामरोजगार सेवकांना मासिक ८ हजार रुपये मानधन व २ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर करण्यात आला आहे.          

राज्यातील २८ हजार ग्राम रोजगार सेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले.सांगोला तालुक्यातील ७६ ग्राम रोजगार सेवकांना या वाढीव मानधनाचा फायदा होणार आहे.सांगोला तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष तुकाराम मिसाळ,उपाध्यक्ष लक्ष्मण लेंडवे यांनी पंचायत समिती समोर गुलालाची उधळण करत शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले. या निर्णयानंतर,सांगोला तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयाला भेट देऊन आमदार शहाजीबापू पाटील यांचेही आभार मानले.

महायुती सरकारने ३० सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील २८ हजार ग्रामरोजगार सेवकांना प्रति महिना ८ हजार रुपये मानधन व २ हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जाहीर केला. त्याबद्दल,सांगोला तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांचा १७ वर्षाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागल्याने संघटनेकडून शासनाचे आभार मानण्यात आले.शासनाकडून मिळणाऱ्या मानधनामुळे सांगोला तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक संघटनेकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.त्यानंतर, आम.शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये ग्रामरोजगार सेवकांनी भेट दिली असता,यावेळी माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ यांनी ग्रामरोजगार सेवकांना शुभेच्छा दिल्या.
———————————————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button