लोणारी समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – नाम.अतुल सावे
सांगोला :
लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे व इतर विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच ठेवण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री नाम.अतुल सावे यांनी नुकतीच दिली.
लोणारी समाजातील बांधवांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक असून या अनुषंगाने, लोणारी समाजाच्या विविध मागण्यांविषयी चर्चा करण्यासाठी मंत्री नाम.अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील मंत्रालयात नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती.लोणारी समाजासाठी समाजरत्न विष्णुपंत दादरे लोणारी यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच ठेवण्यात येईल.
लोणारी समाज हा वंचित समाज असून त्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून करण्यात येत होती. या मागणीसाठी समाजाकडून तहसिल कार्यालय,सांगोला येथे १३ ऑगस्ट रोजी बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले होते.त्याची दखल घेऊन मंत्रालय येथे बैठक घेण्याची ग्वाही राज्य शासनाने दिली होती. त्याअनुषंगाने,बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आर्थिक विकास महामंडळ तसेच लोणारी समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी नवी मुंबई व पुण्यामध्ये वसतीगृह सुरु करावे, लोणारी समाजाचे विष्णुपंत दादरे यांचे सांगोला तालुक्यात स्मारक व लोणारी भवन उभारण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती लोणारी समाज सेवा संघ,सांगोलाचे अध्यक्ष संतोष करांडे यांनी दिली.
या बैठकीस आमदार जयकुमार गोरे,आमदार गोपीचंद पडळकर,आमदार संजयमामा शिंदे,माण तालुका भाजपचे अध्यक्ष शिवाजी शिंदे व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, प्रशासकीय अधिकारी तसेच उपोषणकर्ते अध्यक्ष संतोष करांडे, सचिव दत्तात्रय नरळे,ता.संघटक बाबासाहेब खांडेकर,डॉ.सुदर्शन घेरडे व लोणारी समाज सेवा संघ,सांगोला संघटनेच्या पदाधिकऱ्यांसह महाराष्ट्र राज्यातील विविध भागांतील लोणारी समाज बांधवांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
——————————————————————————