महत्वाच्या बातम्या

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी २ कोटींच्या निधीची तरतूद करावी – दीपकआबा साळुंखे-पाटील

सांगोला :

                         संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्व करुन मरगळलेल्या मराठी मनात अस्मितेची फुंकर भरणाऱ्या लोकशाहीर,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे सांगोला शहरात देखणे आणि भव्य-दिव्य स्मारक व्हावे,ही अनेक वर्षांची मागणी आहे. राज्य सरकारने या स्मारकासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करावी,अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली असून दीपकआबांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री अजितदादांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

                सांगोला शहरातील तमाम समाज बांधवांची अनेक वर्षांपासून असणारी ज्वलंत मागणी लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी बुधवारी २१ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांचेकडे या मागणीचे लेखी निवेदन दिले. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत आणि संपूर्ण मराठी साहित्य विश्वात महत्वपूर्ण योगदान आहे. आपल्या साहित्य विश्वातून आणि प्रबोधनात्मक पोवाड्यातून त्यांनी जनजागृती करुन खऱ्या अर्थाने वंचित व पीडित वर्गाला स्वाभिमानाने जगण्याची ऊर्जा दिली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे सांगोला शहरात भव्य दिव्य स्मारक झाल्यास,अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे येणाऱ्या पिढीला स्मरण राहील व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यापासून तरुणांना प्रेरणा मिळेल,असा आशावाद माजी आमदार दीपकआबा यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान सांगोला शहरातील तमाम समाज बांधवांच्या ज्वलंत भावना लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही माजी आमदार दीपकआबा यांच्या या मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शवत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारकासाठी लवकरच भरीव आर्थिक निधीची तरतूद करणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे शहरातील समाज बांधवात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button