सांगोला :
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु होत असून पाणी टंचाई तीव्र प्रमाणात जाणवायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे,सांगोला व पंढरपूर तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा,शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होवू शकतो,त्यामुळे आमचे हक्काचे पाणी वेळेत मिळावे व चालू उन्हाळी आवर्तन हे २ मार्च पासून सुरु करण्यात यावे आणि आमचे हक्काचे पाणी न देणार्या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे,अशी आक्रमक मागणी सांगोल्याचे आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी पुणे येथील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली.
महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली कालवा सल्लागार समितीची बैठक पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री नाम.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदा मंत्री नाम. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी,सोलापूर जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी तसेच जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.कालवा सल्लागार समितीची बैठक विविध कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे दिसून आले.
सदर बैठकीत सांगोल्याचे आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख हे सांगोला व पंढरपूर तालुक्यातील पाणीप्रश्नांवर आक्रमक झाल्याचे दिसून आले.यावेळी, आम.डाॅ. बाबासाहेब देशमुख यांनी एन.आर.बी.सी. च्या कॅनाॅलचे अस्तरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे,यासाठी चालू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात विधान भवनात बैठक आयोजित करण्यात यावी,अशी मागणी केली.तसेच सांगोला व पंढरपूर तालुक्याचे हक्काचे पाणी वेळेत मिळावे.पाणी वापर संस्थेचे अनुदान परतावा अद्यापही दिला गेलेला नसून तो परतावा लवकरात लवकर देण्यात यावा आणि पाणीपट्टी ही अव्वाच्या सव्वा वाढविण्यात आली असल्याने शेतकऱ्यांना ती रक्कम भरणे शक्य होणार नाही.तरी, शासनाने पाणीपट्टीची रक्कम ही लवकरात लवकर कमी करुन मायबाप शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी आम.डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी या बैठकीत केली.
—————————————————————————
मागण्यांना मंत्रीमहोदयांनी दिला सकारात्मक प्रतिसाद :
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सांगोल्याचे आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या विवीध मागण्यांना उपमुख्यमंत्री नाम.अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री नाम.राधाकृष्ण विखे-पाटील यांचेसह जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
More Stories
घरपट्टीत कसलीही दरवाढ नाही,ही तर वाढीव बांधकामामुळे करवाढ – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने
दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा
स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिन व जयंती दिनानिमित्त सांगोल्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन