सांगोला नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम
सांगोला :
सांगोला नगरपरिषदेच्या वतीने दि.अं.यो.राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटातील महिलांसाठी दि.२७ व २८ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय निवासी अभ्यास दौरा यशस्वीपणे संपन्न झाला.
दि.अं.यो.राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) ही केंद्र पुरस्कृत योजना सांगोला नगरपरिषद राबवित असून या योजनेच्या माध्यमातून महिला बचत गट,पथविक्रेते,युवक,असंघटित कामगार,धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जातात.याचाच एक भाग म्हणून मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या वतीने दि.२७ व २८ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय निवासी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.या अभ्यास दौऱ्यामध्ये शहरातील विविध बचत गटातील ५० महिला सहभागी झाल्या होत्या.

या अभ्यास दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सांगली येथील बचत गटातील महिलांच्या माध्यमातून सुरु केलेल्या काजू प्रक्रिया उद्योग व पाणीपुरी उद्योग यांना भेट देण्यात आली.तसेच इचलकरंजी येथील ब्लू स्टार मशिनरी शोरुम या ठिकाणी गृह उद्योगांमध्ये उपयोगी पडणाऱ्या विविध मशीनची पाहणी व माहिती बचत गटातील महिलांनी घेतली. तसेच अभ्यास दौऱ्याच्या दुसर्या दिवशी म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथील नगरपरिषदेने बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्याकरिता शहरांमध्ये “सोनचिरीया शहर उपजीविका केंद्रा”ची सुरुवात केली आहे.यामध्ये शहरातील विविध सेवांची माहिती व बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री केली जाते,या केंद्रास भेट देण्यात आली.
यावेळी,बचत गटातील महिलांनी या अभ्यास दौर्यास उस्फूर्त असा प्रतिसाद देत सर्व उद्योग व्यवसायांची सविस्तर माहिती घेतली. या अभ्यास दौर्यामध्ये शहर स्तर संघाच्या अध्यक्षा सुनंदा घोंगडे,सचिव मनिषा हुडेकरी व बचत गटातील इतर ५० महिलांनी सहभाग नोंदविला.सदर अभ्यास दौर्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी कार्यालयीन अधिक्षक सचिन पाडे, सहा.प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे,बिराप्पा हाक्के व शहर उपजीविका केंद्राचे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
——————————————————————————
विविध योजनांच्या माध्यमातून उपजीविका वाढविण्याकरिता नगरपरिषद कटीबध्द :
या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना विविध यशस्वी गृह उद्योग प्रकल्पास भेट देऊन माहिती घेता आली.या अभ्यास दौऱ्याचे फलित म्हणजे सांगली येथे अभ्यास दौऱ्यादरम्यान गुरुकृपा बचत गटाने चकली व कुरडई मशीन बुक केली. यापुढेही विविध योजनांच्या माध्यमातून शहरातील महिला, युवक,पथ विक्रेते, असंघटित कामगार,धोकादायक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती यांची उपजीविका वाढविण्याकरिता नगरपरिषद कटीबध्द राहील.
– मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी.
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने