अश्‍वारुढ शिवशिल्पाचे शुक्रवारी होणार सांगोला शहरात आगमन

सांगोला :

                            सांगोलावासीयांना उत्सुकता लागून राहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ शिवशिल्पाचे सांगोला शहरात शुक्रवारी सकाळी भव्यदिव्य मिरवणुकीद्वारे आगमन होणार असून जल्लोषपूर्ण वातावरणात लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती शिवप्रेमींकडून देण्यात आली.

सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अश्‍वारुढ शिवशिल्प व्हावे,अशी शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती.त्यानुसार सांगोला नगरपरिषदेच्या सहकार्याने व आर्किटेक्ट संकेत शास्त्री यांचे मार्गदर्शनाखाली एक ऐतिहासिक वारसा जपणारे शिवशिल्प तयार करण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालय विभागाचे मार्गदर्शनानुसार कोल्हापूर येथील शिल्पकार संताजी चौगुले यांनी भव्य-दिव्य शिवशिल्प साकारलेले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्‍वारुढ शिवशिल्प हे कोल्हापूरहून गुरुवारी जल्लोषपूर्ण वातावरणात व सांगोला तालुक्यातील हजारो शिवभक्तांच्या वाहनाच्या ताफ्यांसह सांगोल्याकडे रवाना झाले आणि सांगोला तालुक्यातील जुनोनी,हातीद,पाचेगाव खुर्द,कारंडेवाडी व नाझरा मठ आदी ठिकाणी शिवशिल्पाचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले असून शुक्रवारी सकाळी १० वाजता हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत सांगोला शहरातील अंबिका मंदिर येथून ढोल पथक,लेझीम पथक,टाळपथक,उंट,घोडे व मावळे यांच्या लवाजम्यासह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी सांगोला शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर भगवे झेंडे,स्वागत कमानी व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे.

सांगोला शहरातील भीमनगर,वाढेगाव नाका,कडलास नाका,वासुद चौक,महात्मा फुले चौक,नेहरु चौक व शेवटी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी विविध समाज बांधवांच्या वतीने शिवशिल्पाचे भव्य स्वागत होणार असून मिरवणुकीमध्ये सामील झालेल्या शिवप्रेमींसाठी आपली सेवा देणार आहेत.हे शिवशिल्प व शिवतीर्थ साकार होत असताना जेष्ठ मंडळींचे मार्गदर्शन,पत्रकार बांधवांचे सहकार्य तसेच बहुजन समाजातील समाज बांधव व सामाजिक संघटना यांचे बहुमूल्य सहकार्य लाभलेले आहे.या सर्वांच्या ऋणातून शिवप्रेमी मंडळ कधीही उतराई होऊ शकत नाही. शिवशिल्प शिवतीर्थावर विराजमान झाल्यानंतर लवकरच लोकार्पण सोहळाही होणार असल्याचे सांगोला येथील शिवप्रेमी मंडळाकडून सांगण्यात आले.
——————————————————————————