मनोरंजन

ऐकावे ते नवलच : धुलीवंदन दिनी मानाच्या जावयाची गाढवावरुन मिरवणूक

 

विडा (ता.केज ) :

बीड जिल्ह्यातील विडा नांवाच्या एका छोट्या गांवात १५० वर्षांची एक अनोखी परंपरा गांवकरी आजही पाळत असून धुलिवंदनाच्या दिवशी मानकरी जावयास रंग लावून गाढवावरुन मिरवणूक काढली जाते आणि
मिरवणुकीनंतर जावयाला नवीन कपड्याचा आहेर करुन सासरच्या मंडळीकडून एक सोन्याची अंगठीही देण्यात येते.

केज तालुक्यातील विडा गांवातील १५० वर्षाच्या परंपरेचे यंदाचे मानकरी जावई म्हणून जवळबन येथील अविनाश करपे यांची निवड झाली होती.ते जवळबन येथे झोपेत असतानाच सोमवारी मध्यरात्री २ वा. निवड समितीने त्यांना ताब्यात घेतले.विडा येथील जावयाची धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावरुन ढोल,ताशा, आणि डीजेच्या तालावर गांवातून मिरवणूक काढली जाते. त्यामुळे धुलिवंदनाची चाहूल लागताच विडेकरांचे सर्व जावई आपले मोबाईल स्विचऑफ़ करून भूमिगत होतात. तीन दिवसांपासून विडेकरांनी नेमलेली समिती अविनाश करपे या मानकरी जावयाच्या शोधात होती. अखेर झोपेत असताना सोमवारी रात्री २ वा. जवळबन येथून जावई अविनाश करपे यांना ताब्यात घेण्यात आले आणि लागलीच त्यांना मोठ्या सन्मानाने गांवात आणण्यात आले. त्यांना रंग लावून गाढवावर बसवत विडा गांवातून मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे,मिरवणुकीनंतर जावयाला नवीन कपड्याचा आहेर व सासरच्या मंडळीकडून सोन्याची अंगठीही देण्यात आली.
————————————

१५० वर्षांची अनोखी परंपरा :

                      दीडशे वर्षांपूर्वी थट्टा मस्करी मधून विडा येथील आनंदराव देशमुख यांनी आपल्या जावयाला गाढवावर बसवून गांवातून मिरवले होते. याचेच रुपांतर नंतर दरवर्षी गांवच्या जावयाला गाढवावरुन मिरवणूक काढण्यात झाले आणि तेथूनच या रुढी परंपरेला प्रारंभ झाला. ही परंपरा खंडित होऊ द्यायची नाही म्हणून, गांवकरी दरवर्षी गांवच्या जावयाचा शोध घेत त्याची गाढवावरुन मिरवणूक काढतात.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button