धक्कादायक : धर्मराज काडादींनी केतन शहांना दिली गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी

 

सोलापूर :

सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा निर्माण करणार्‍या सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी त्वरीत पाडून विमानसेवा पूर्ववत सुरु करावी, या मागणीसाठी गेल्या १९ दिवसांपासून सुरु असलेल्या चक्री उपोषणामुळे संतापलेले सिध्देश्वर कारखान्याचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक धर्मराज काडादी यांनी थेट उपोषण स्थळ गाठून केतन शहा यांना रिव्हाॅल्व्हर दाखवून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याने संपूर्ण सोलापूर शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, शांत व संयमी असलेल्या काडादींचा हा नवा अवतार पाहून सोलापूरकर मात्र, अक्षरश: अवाक् झाले आहेत.

सोलापूर येथे होटगी रोडवर विमानतळ असूनही कुमठे येथील सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ही विमानसेवा बंद करण्यात आल्याने सोलापूरकर अस्वस्थ आहेत.त्यामुळे विमानसेवेला अडथळा ठरणार्‍या या चिमणीला त्वरीत पाडून विमानसेवा पूर्ववत सुरु करावी,म्हणून सोलापूरातील उद्योजकांसह इतर लोकांकडून अनेक तक्रारी करण्यात आल्यामुळे चिमणी पाडण्याचे आदेशही झाले आणि त्यानुसार महानगरपालिकेने अनेक नोटीसाही दिल्या. परंतु,कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी हे वरिष्ठ पातळीवरुन सूत्रे हलवून चिमणीचे पाडकाम रोखण्यास आजतागायत यशस्वी ठरले आहेत.

त्यामुळे शेवटी, विमानसेवेला अडथळा ठरणार्‍या या चिमणीला त्वरीत पाडून विमानसेवा पूर्ववत सुरु करावी, या मागणीसाठी सोलापूर शहरातील कांही मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटवर मागील १९ दिवसांपासून चक्री उपोषणाला बसले आहेत.या चक्री उपोषणामुळे बिथरलेल्या धर्मराज काडादी यांनी थेट उपोषणस्थळ गाठून कांही लोकांसह उपोषणाला बसलेल्या केतन शहा यांना दमबाजी करत खिशातून चक्क रिव्हाॅल्व्हर काढून “माझ्याबद्दल वैयक्तीक कांही बोललास तर गोळ्या घालून ठार मारेन” अशी सरळसरळ मारण्याची धमकीच दिल्याने तिथे उपस्थित असलेले सर्वचजण अवाक् झाले. त्यांच्या या धमकीमुळे आता पुढे काय होणार ? अशी उलटसुलट चर्चा सगळीकडे चालू आहे.
—————————————————————————