सांगोला नगरपरिषदेची घरपट्टी व पाणीपट्टी नागरिकांनी त्वरीत भरावी – मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी

सांगोला :

सांगोला नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता धारकांकडून घरपट्टी,पाणीपट्टी,गाळा भाडे आणि खुल्या जागेचे भाडे आदी कर वसुलीची मोहीम सध्या,नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येत असून नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी त्वरीत भरावी,असे आवाहन सांगोला नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी केले आहे.

सांगोला शहरातील नागरिकांना मुलभूत सुखसुविधा पुरविण्यासाठी तसेच शहराचा विकास करण्यासाठी घरपट्टी,पाणीपट्टी,गाळा भाडे,खुली जागा भाडे याची थकीत व चालू वर्षाची कर वसुली होणे अत्यंत गरजेचे आहे.तरी,शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी आपल्या थकीत रकमेचा भरणा नगरपरिषद कार्यालयात त्वरित करावा अन्यथा नगरपालिका प्रशासनास, नाईलाजास्तव नळ कनेक्शन कट करावे लागेल,थकीत मालमत्ता धारकांची यादी वर्तमानपत्रात आणि चौकात बोर्ड लावून प्रसिद्ध करावी लागेल तसेच नगरपरिषद मालकीचे गाळे सील करुन ताब्यात घेण्यात येतील. त्यामुळे,अशा प्रकारची कटू कारवाई टाळायची असेल तर,शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी आपल्या थकीत व चालू रकमेचा भरणा नगरपरिषद कार्यालयात त्वरीत करावा,असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी केले आहे.
——————————————————————————

“भुयारी गटार योजना” या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी नागरिकांकडून संयम व सहकार्याची अपेक्षा :

सध्या,सांगोला शहराच्या संपूर्ण भागात “भुयारी गटार योजना” या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेगाने सुरु असून सदर कामामुळे शहरात धुळीचा त्रास वाढला आहे,याची जाणीव नगरपरिषद प्रशासनासही आहे.परंतु,एका चांगल्या प्रकल्पाचा लाभ घेण्याकरिता शहरातील नागरिकांना नाईलाजास्तव,आणखी थोडे दिवस खराब रस्ते व धुळीचा त्रास सहन करावा लागेल.सदर प्रकल्प लवकरच पूर्ण करुन शहरात नवीन रस्तेही तयार करण्यात येणार आहेत.यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे आणि भुयारी गटार योजना पूर्ण झाल्यास उघड्यावरील सांडपाण्याची समस्या कायमस्वरुपी बंद होणार असून नागरिकांचे आरोग्यही चांगले राखण्यास मदत होणार आहे.तरी,या प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी शहरातील नागरिकांकडून संयम व सहकार्याची अपेक्षा आहे.         – मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी.