जागतिक क्षय दिनानिमित्त शिवाजी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन

सांगोला :
सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र,अकोलाचे प्राथमिक वैज्ञानिक अधिकारी सतीश राऊत यांनी विद्यार्थ्यांना क्षयरोगा विषयी सविस्तर माहिती दिली.क्षयरोगाची कारणे,लक्षणे,उपचार व प्रतिबंध याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पुढे बोलताना सतीश राऊत यांनी सांगितले की, क्षयरोग हा रोग भयंकर नसून त्यावर प्रभावी औषधी उपलब्ध असून नियमित व पूर्ण औषधे घेतल्यास क्षयरुग्ण पूर्णपणे हमखास बरा होतो.क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यांनी विद्यार्थ्यांना क्षयरोगाविषयी समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले. “TB हरा,देश जीता” या संदेशाचा प्रचार करण्याचे महत्त्व सांगितले. यावेळी त्यांनी सकस,संतुलित आहार आणि योगाचा समावेश केल्यास शरीर तंदुरुस्त राहते,मानसिक आरोग्य सुधारते आणि जीवनशैली निरोगी राहते. तसेच नियमित व्यायाम व योग्य आहारामुळे दीर्घायुष्य आणि सुदृढ आरोग्य मिळवता येते,असे सांगितले.
या कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांनी विद्यार्थ्यांना या वर्षाची क्षय रोगावरची थीम Yes ! We Can End TB : Commit, Invest, Deliver समजावून सांगितली. तसेच विद्यार्थ्यांना सार्वजनिक आरोग्य विषयक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तर सत्राद्वारे प्रमुख पाहुण्यांशी संवाद साधला.संस्थाध्यक्ष बाबुराव गायकवाड,सचिव ए.आर.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा जागरुकता उपक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमात कॉलेजचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.ए.वाय.गायकवाड यांनी केले.
——————————————————————————