गुढीपाडव्याच्या दिवशी वृत्तपत्र विक्री बंदचा इशारा

सांगोला :

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या दैनंदिन अडीअडचणींचा विचार न करणार्‍या व कमिशनची रक्कम वाढवण्याचा विचार न करणार्‍या वृत्तपत्राची गुढीपाडव्याच्या दिवशी विक्री बंद करण्याचा इशारा सांगोला तालुका वृत्तपत्र विक्रेत्यांच्या बैठकीत नुकताच देण्यात आला.

सांगोला तालुका वृत्तपत्र विक्रेत्यांची बैठक सांगोला येथील बोत्रे कॉम्प्लेक्समध्ये संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.या बैठकीत गुढीपाडव्याच्या दिवशी वृत्तपत्र विक्री बंदचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

ऊन,वारा,पाऊस याची तमा न बाळगता वृत्तपत्र विक्रेता गेली अनेक वर्षे झाले घरोघरी फिरुन पेपर वाटप करतात.वृत्तपत्र विक्रेते हे कोरोनाच्या काळापासून आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे, त्यांनी अनेकवेळा सातत्याने कमिशन वाढवून ३० टक्के कमिशन द्या,अशी मागणी करणारे निवेदन वृत्तपत्रांच्या कंपनीकडे वेळोवेळी दिले आहेत. परंतु, याकडे कंपन्यांनी अद्याप लक्ष दिले नाही.त्यामुळे बरेच वृत्तपत्र विक्रेते हा व्यवसाय बंद करण्याच्या मन:स्थितीत आहेत.

याबाबतची मागणी सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेनेही केली असून जे पेपर ३० टक्के कमिशन देतील याचा विचार केला जाईल, असे मत संघटनेचे उपाध्यक्ष अमोल बोत्रे व सचिव उत्तमराव चौगुले यांनी व्यक्त केले आणि जे वृत्तपत्र कमिशन वाढवून देण्याबाबत दखल घेणार नाहीत,ते वृत्तपत्र येत्या ३० मार्च रोजी विक्री बंद करण्याचा निर्णय सांगोला तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेकडून सर्वानुमते घेण्यात आला आहे.

सदर प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी सुखदेव पवार, संतोष बनसोडे, रेवणसिद्ध नकाते,रामचंद्र कुंभार, भानुदास जाधव,बाबुराव पवार,अमोल बोत्रे,रविराज शेटे,विकास बोत्रे,डोंगरे काका व विक्रेते बांधव उपस्थित होते.शेवटी सर्वांचे आभार रेवणसिद्ध नकाते यांनी मानले.
——————————————————————————