मुला-मुलींची सुरक्षितता ही काळाची गरज – पी.एस.आय.रुपाली उबाळे
सांगोला :
सध्याच्या काळात अल्पवयीन मुलां-मुलींवर होणारे अत्याचार,बलात्कार व छेडछाडीचे वाढते प्रमाण पाहता,मुला-मुलींची सुरक्षितता ही काळाची गरज असल्याचे मत सांगोला पोलीस ठाण्याच्या पी.एस.आय.रुपाली उबाळे यांनी व्यक्त केले.
सांगोला शहरातील जि.प.प्रा. शाळा भिमनगर येथे “मुला-मुलींची सुरक्षितता व संरक्षण” याविषयी
समाजसेवक बापूसाहेब ठोकळे यांच्या प्रेरणेतून मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना पी.एस.आय.रुपाली उबाळे या बोलत होत्या. यासमयी,महिला पोलीस काॅन्स्टेबल निमगिरे याही उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या वतीने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पीएसआय रुपाली उबाळे व पो.काँ.निमगिरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना पीएसआय रुपाली उबाळे म्हणाल्या की,मुला-मुलींची सुरक्षितता ही काळाची गरज असून यावर उपाय म्हणून,बॅड टच व गुड टच या स्पर्शांची जाणीव आपल्या मुलांना ओळखता आली पाहिजे,पालकांनीही आपल्या मुलांविषयी सतर्क राहण्याची गरज आहे.पालकांनी मुलांशी संवाद साधला पाहिजे,मुलांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत.यामुळे येणाऱ्या संकटावर आपण वेळीच मात करु शकतो.यावेळी,प्रसंगानुरुप उदाहरणे देऊन त्यांनी पालकांमध्ये जागरुकतेची भावना निर्माण केली.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक किशोर बनसोडे, विकास बनसोडे, प्रवीण बनसोडे,अविनाश चंदनशिवे, माजी नगरसेविका विजया बनसोडे,काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मैना बनसोडे,रेश्मा बनसोडे,जयंती बनसोडे, लक्ष्मी बनसोडे,शिल्पा रणदिवे,अनिता काटे,शाळेच्या मुख्याध्यापिका शेळके मॅडम, सहशिक्षिका मैना गायकवाड,पालक वर्ग तसेच भिमनगर व साठे नगर मधील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
——————————————————————————