सांगोल्यात होणार पहिल्या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा शुभारंभ

सांगोला :

सांगोला शहरातील सुप्रसिध्द डाॅ.केळकर हॉस्पिटलच्या प्रशस्त, अत्याधुनिक व सर्व सोईसुविधांनी युक्त अशा नवीन इमारतीचे तसेच या इमारतीमधील नवीन वंध्यत्व निवारण आणि तालुक्यातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे उदघाटन उच्चतंत्र शिक्षण आणि संसदीय मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते तर, अश्विनी रुग्णालय,सोलापूर मधील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ सुमन सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली येत्या सोमवारी ३ ऑक्टोबर २०२२ रोजी संपन्न होणार असल्याची माहिती डॉ. रणजित केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.याप्रसंगी त्यांचेसह डॉ.सतिश केळकर,डॉ.संजीवनी केळकर व डॉ.सुपर्णा केळकर आदी उपस्थित होते.

डॉ.दादा केळकर एक हाडाचा डाॅक्टर  :

सुमारे १९५६ साली डॉ.दादा केळकर यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन स्वतःचे खाजगी हॉस्पिटल सांगोल्यात बांधण्याचा निर्णय घेतला.डॉ.दादा केळकर हे एक हाडाचा डाॅक्टर म्हणून सर्वपरिचीत होते.”रुग्णांच्या दुःखाला विराम आणि वेदनेला आराम” हे त्यांचे ध्येय होते. त्यासाठी ३०-३० कि.मी.अंतरावर सायकलने जावून त्यांनी रुग्णांचे दुर्धर रोग आणि असाध्य व्याधी बऱ्या केल्या तसेच अनेकांना जीवनदान दिले. रुग्ण सेवेसोबत त्यांनी समाजसेवा आणि राजकारण यांचाही मेळ घातला. त्यांच्या पत्नी चंपूताई या नर्स होत्या. त्यांनी आयुष्यभर दादांना साथ दिली व दोघांनी मिळून रुग्णसेवा आणि समाजसेवेच्या पायावर मानवतेचे मंदिर उभारले. त्यांच्या अंधत्वामुळे दादांना पुन्हा रुग्णांना वैद्यकिय सेवा देणे बंद करावे लागले.त्यानतर त्यांची धुरा डॉ.सतीश केळकर यांनी आपल्या खांद्यावर घेतली.

डॉ.सतीश केळकर यांनी रुग्णांना दिली अद्यावत सुविधा :

सांगोल्यातील पहिले एक्स-रे मशीन,पहिले सोनोग्राफी मशीन तसेच रक्ताच्या प्राथमिक तपासण्या संपूर्ण तालुक्यात प्रथम सुरु झाल्या, त्या केवळ डॉ.सतीश केळकर यांच्या हॉस्पिटलमध्येच. त्यामुळे केळकर हॉस्पिटलचा नावलौकिक हा पूर्वीपासूनच असून आजही ती धुरा डाॅ.संजीवनी,डाॅ.रणजित व डाॅ.सुपर्णा हे केळकर कुटूंबिय यशस्वीपणे आपल्या खांद्यावर पुढे नेत आहेत.

डॉ.संजीवनी केळकर यांचे वैद्यकिय व सामाजिक चळवळीतील विशेष योगदान :

डॉ.संजीवनी केळकर या सांगोला तालुक्यातील पहिल्या महिला डॉक्टर असून रुग्णसेवा देत असताना, ग्रामीण महिला सोसत असलेल्या लाथा बुक्क्यांचे उन्हाळे आणि त्यांच्या वेदनांची जाणीव ठेवून डाॅ.संजीवनी यांनी रुग्णसेवेसोबत सांगोल्यासारख्या दुष्काळी तालुक्यात १९७८ मध्ये “माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान” ही महिलांची संस्था स्थापन करुन समाजसेवेचे व्रत हाती घेतले.ग्रामीण महिलांचे सबलीकरण, ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि जलसंधारण या ३ कामात डाॅ.संजीवनी यांनी विशेष लक्ष दिले. विवीध योजना व उपक्रम राबवून त्यांनी तालुक्यात स्त्रियांच्या परिवर्तनाची चळवळ सुरु केली. या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत त्यांच्यामुळे हजारो महिलांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमलले. डाॅ.संजीवनी यांना त्यांच्या या विशेष योगदानाबद्दल त्यांना नुकताच मृत्युंजय प्रतिष्ठानचा सामाजिक कार्याबाबतचा पुरस्कारही प्रदान करण्यात आलेला आहे.

केळकर कुटुंबीयांकडून वैद्यकिय क्षेत्रात एक नवा मापदंड :

डॉ.रणजीत व डॉ.सुपर्णा केळकर यांनी केळकर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सातत्याने अद्यावत सुविधा देण्याचा प्रयत्न केला असून नव्याने उभारलेल्या तीन मजली हॉस्पिटल व टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मुळे सांगोला तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात केळकर कुटुंबीयांनी यानिमीत्ताने एक नवा मापदंड उभारला असून केळकर हॉस्पिटलमध्ये आता अत्यल्प दरात रुग्णांना सेवा मिळणार आहेत.
—————————————————————————

टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे स्वप्न साकारले :

गेल्या अनेक दिवसांपासून आपला मानस होता की,सांगोला शहर, तालुक्यातील व ग्रामीण भागातील रुग्णांसाठी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर चालू करावे. आज प्रत्यक्षात ते सेंटर आपल्या हाॅस्पीटलमध्ये चालू होत असून अतिशय कमी खर्चात आणि उत्कृष्ठ सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.त्यामुळे सांगोला तालुक्यासह आसपासच्या तालुक्यांतील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.
       – डॉ.रणजित केळकर.
—————————————————————————