दुचाकी,मोबाईल व इले.मोटारी चोरणारे सराईत गुन्हेगार सांगोला पोलीसांच्या ताब्यात
सांगोला :
दुचाकी (मोटरसायकली),इलेक्ट्रिक मोटारी, पाणबुडी व मोबाईल दुकान फोडून मोबाईलची चोरी करणारे सराईत गुन्हेगार केराप्पा उर्फ किरण तानाजी सरगर व अजय लहू कांबळे (दोघे रा.चिंचोली,ता.सांगोला) या दोघांना सांगोला पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकंदरीत सहा गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून गुन्ह्यातील ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात सांगोला पोलिसांना यश आले आहे तर,या गुन्ह्यातील इतर दोन आरोपींचा शोध सांगोला पोलीस घेत आहेत.
याबाबत सविस्तर हकिकत अशी की,सांगोला शहरानजीकच्या नरुटे वस्ती येथील सतीश शंकर मदने यांचे शेतातील विहिरीवरुन एक सिकाॅन कंपनीची 3HP ची इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार व काळ्या रंगाची केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली असल्याबाबत दि. 4 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत इले.व पाणबुडी मोटारींच्या चोऱ्या वाढत असल्याने मंगळवेढा उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील व सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी
सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना, एक तपास पथक तयार करुन या पथकामार्फत पाणबुडी, इलेक्ट्रिक मोटार व इतर साहित्य चोरुन नेणार्या आरोपींचा शोध घेत असता दि.२२ सप्टेंबर रोजी रात्री ७ चे सुमारास चिंचोली (ता.सांगोला) येथील एक इसम जुन्या पाणबुडी मोटार विकत असल्याची माहिती गोपनीय व्यक्तीकडून प्राप्त झाल्याने या पथकातील पोलीस कर्मचार्यांनी तातडीने पावले उचलत चिंचोलीतील त्या आरोपीला ताब्यात घेवून त्याची विचारपूस केली असता,त्याने बऱ्याच ठिकाणाहून त्याच्या ३ साथीदारांच्या मदतीने पाणबुडी मोटार चोरल्याची कबुली दिली.
यावेळी पोलीसांनी दोघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ९ इले. पाणबुडी मोटारी,१ HP मोटार, १ हिरो कंपनीच्या दुचाकीचे इंजिन, १ एस.टी.पी.पाईपचा बंडल हस्तगत केला असून सदर जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हा अंदाजे ८९ हजार रुपये किंमतीचा आहे. सदर गुन्ह्यात केराप्पा उर्फ किरण तानाजी सरगर व अजय लहू कांबळे (दोघे रा.चिंचोली,ता.सांगोला) या दोघांना अटक करण्यात आली असून इतर दोन आरोपींचा शोध चालू आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.दत्ता वजाळे,पो.ना. अभिजीत मोहोळकर, पो.ना.बाबासाहेब पाटील, पो.ना. अभिजीत साळुंखे,पो.ना.गणेश मेटकरी, पो.ना.सुनील मोरे व सायबर पोलीस स्टेशन कडील पो.कॉ.अन्वर अत्तार यांनी तपास करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
—————————————————————————