सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ठाकरेंची धाकधूक वाढवणारा ?

मुंबई :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गटाच्या अर्जावरील सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली असून शिवसेना पक्ष खरा कोणाचा ? या प्रश्नावर केंद्रीय निवडणूक आयोगा समोर सुरु असलेल्या कार्यवाहीला स्थगिती न देता, धनुष्यबाण या पक्ष चिन्हाबाबत निर्णय घेण्यास निवडणूक आयोग मोकळे असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. त्यामुळे,न्यायालयाचा हा निकाल ठाकरेंची धाकधूक वाढवणारा ठरला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा ना.शिंदेंना दिलासा

तर,उध्दव ठाकरेंना धक्का :

धनुष्यबाण पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्यामुळे धनुष्य बाण हे शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह आता कोणाला द्यायचे ? याचा निर्णय घेण्यास निवडणूक आयोग मोकळे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याने कोर्टाचा हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासादायक मानला जात आहे तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची धाकधूक वाढवणारा ठरला असून धनुष्यबाण हे पक्षचिन्ह टिकवण्याची खरी कसोटी आता उद्धव ठाकरे यांचे समोर येवून ठेपली आहे.

             दसरा मेळाव्याच्या उत्साहावर विरझण :

दसरा मेळावा शिवाजी पार्कच्या मैदानावर घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच ठाकरे गटाच्या बाजूने दिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये एकप्रकारचा उत्साह संचारला होता. “विजय आपलाच होणार,आई भवानीवर विश्वास आहे,” अशा शब्दात सुप्रीम कोर्टातील सुनावणी दरम्यान उद्धव ठाकरेंनी विजयाची खात्री व्यक्त केली होती.मात्र, त्यानंतर आलेला कोर्टाचा निर्णय ठाकरेंची धाकधूक वाढवणारा ठरला आहे.

  सुप्रीम कोर्टात काय घडलं ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गटाच्या अर्जावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाल्यानंतर शिवसेना पक्ष खरा कोणाचा ? या प्रश्नावर केंद्रीय निवडणूक आयोगा समोर सुरु असलेल्या कार्यवाहीला स्थगिती न देता,कोर्टाने ठाकरे गटाचा अर्ज फेटाळला. केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील कार्यवाहीला स्थगिती नसेल,असे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सुनावणीअंती दिलेल्या आदेशात स्पष्ट केल्यामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातो.

निवडणुकीच्या तोंडावर चिन्हाचा निर्णय :

मुंबई महापालिकेसह अन्य निवडणुका तोंडावर असताना केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय काय येतो ? आणि शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत काय आदेश होतो ? त्याबद्दल आता मोठी उत्सुकता आहे.

 अंधेरी पोटनिवडणुकीसाठी महत्त्वाचा निकाल :

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही सध्या तोंडावर आली असून या पार्श्वभूमीवर निवडणूक चिन्हाबाबत लवकर निकालासाठी एकनाथ शिंदे गटाची घाई सुरु होती. त्यामुळे पक्षचिन्हाची रस्सीखेच सुरु असताना हा कोर्टाचा निकाल महत्वाचा आहे.

निवडणूक आयोगाकडून तीन शक्यता ?

* दरम्यान, निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह ठाकरे किंवा शिंदे यापैकी एका गटाला देण्याचा निर्णय घेऊ शकतात किंवा पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेऊ शकतात, तसं झाल्यास दोन्ही गटांना नवीन चिन्हं दिले जाईल. हा निर्णय शिंदेंसाठी तितकासा फटका बसणारा नसला, तरी उद्धव ठाकरेंना मोठा हादरा बसू शकतो.

१) शक्यता पहिली : धनुष्य बाण हे पक्षचिन्ह उद्धव ठाकरे यांना

२) शक्यता दुसरी : धनुष्य बाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना

३) शक्यता तिसरी : धनुष्य बाण हे पक्षचिन्ह गोठवणे. ठाकरे किंवा शिंदे यापैकी कोणालाही धनुष्यबाण नाही.
—————————————————————————