बापरे,खंडणीसाठी थेट पुण्याच्या भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनाच मेसेज
पुणे :
पुणे येथील पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांना जनसंपर्कासाठी असलेल्या त्यांच्या मोबाईलवर आणि त्यांचे दीर दीपक मिसाळ (माजी नगरसेवक) यांच्या मोबाईलवर गुन्हेगारांनी मेसेज करुन ५ लाख रुपयांची खंडणी मागितली असून पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
अलिकडे,पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले असून खून,अपहरण,दरोडे यांसारखे गुन्हे सर्रास घडताना दिसत आहेत. आता तर,गुन्हेगारांची हिम्मत थेट आमदारांनाच खंडणी मागण्यापर्यंत पोहोचली आहे. याप्रकरणी दीपक मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून दीपक मिसाळ यांच्या फिर्यादीनंतर बिबवेवाडी पोलिसांनी इम्रान समीर शेख (विकासनगर,घोरपडीगांव)यास अटक केली आहे. यापूर्वी इम्रान शेख याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यातही असाच एक गुन्हा दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक मिसाळ यांचे मोबाईलवर तसेच त्यांची भावजय आमदार माधुरी मिसाळ यांचा जनसंपर्कासाठी असलेल्या संपर्क क्रमांकावर आरोपीने मेसेज केले असून त्याने कधी २ लाख, कधी ३ लाख, तर कधी ५ लाख रुपयांची खंडणी मागणारे मेसेज केले आहेत. सुरुवातीला त्यांनी अशा मेसेजकडे दुर्लक्ष केले होते.त्यानंतर याव्यतिरिक्त आणखी एका मोबाईल क्रमांकावर “पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी”आरोपीने दिली. त्यानंतरच दीपक मिसाळ यांनी पोलिसांकडे तक्रारी अर्ज दिला होता. त्यावरुन पोलिसांनी भा.दं.वि.कलम ३८६ आणि आयटीअॅक्ट कलम ६६ सी नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत,आम.माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, माझे दीर दीपक मिसाळ यांना त्यांच्या मोबाईलवर दिवसाला ४० ते ५० धमकीचे मेसेज येत आहेत. पैसे नाही दिले तर, बलात्काराची केस दाखल करु,असा मेसेज पाठवत आहे. दिवसेंदिवस ते खंडणीची रक्कम वाढवत आहेत. २ दिवसाआधी तक्रार देऊनही काल रात्री १२ वाजेपर्यंत मेसेज येत होते आणि शेवटचा मेसेज तर असा होता की, त्यात “पैसे नाही दिले,तर मारुन टाकू”अशी धमकीच देण्यात आली होती.
या प्रकरणी पोलीस तपास करत असून ज्या-ज्या मुलांची यात नांवे येत आहेत, त्या मुलाचे अकाऊंट हॅक झाले आहेत. जवळजवळ १५ ते १६ नंबरवरून हे मेसेज येत आहेत, अशी माहिती यावेळी आम.माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. हा सगळा प्रकार हा प्रकार १८ ते २३ सप्टेंबर दरम्यान घडला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.