सांगोला :
शेतीच्या पाण्याच्या बाबतीत शरद पवारांसह मोहिते-पाटील यांनी कायमच सांगोला तालुक्यावर अन्याय केला आहे.मात्र,विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी बारामतीकरांशी दोन हात करुन सांगोला तालुक्याला हक्काचे पाणी मिळवून दिले असून सांगोला तालुक्यात हरितक्रांती होण्यासाठी दुष्काळी भागाला पाणी वळवणारा खासदार म्हणून रणजितसिंह निंबाळकर यांना प्रंचड मतांनी विजयी करावे,असे आवाहन करुन अकलूजकरांसह बारामतीकरांनी सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी पळवल्यानेच तालुका दुष्काळाच्या खाईत लोटला गेला,असा आरोप आमदार शहाजीबापू पाटील यांनी गांवभेट दौर्यात केला.
माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यात गांवभेट दौरा संपन्न झाला. कमलापूर,अनकढाळ,राजुरी,उदनवाडी,पाचेगाव,ह. मंगेवाडी,जुजारपूर,हातीद,सोमेवाडी,बुद्धेहाळ,गौडवाडी या गांवात गावभेट दौरा करुन त्यांनी मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर जुनोनी येथे जाहीर सभा संपन्न झाली.यावेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की, अकलूजकरांसह बारामतीकरांनी शेतीच्या पाण्याबाबत सांगोला तालुक्यावर अन्याय केल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनात आजही आहे. त्यामुळे सांगोल्याचे पाणी पळवणाऱ्या पवारांसह मोहिते- पाटलांनी जनतेची दिशाभूल करु नये.गेल्या ५ वर्षांत शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचे आवर्तन चांगल्या प्रकारे मिळाल्याने लोकसभा निवडणुकीत पाणीप्रश्न टर्निंग पॉईट ठरला आहे.सांगोल्याच्या हक्काचे बारामतीकरांनी पळवून नेलेले पाणी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पुन्हा आपल्या दुष्काळी भागाकडे वळवले आहे. तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेल्या टेंभू योजनेचा विस्तार करुन अधिकचे २ टीएमसी पाणी तालुक्याला मिळाले आहे. ऐन उन्हाळ्यात शेतीचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी टेंभू योजनेतून माण नदीत पाणी सोडले आहे.शरद पवारांनी सांगोला तालुक्याचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मिटवू,अशी मावळत्या सूर्याला साक्ष मानून शपथ घेतली होती.मात्र,शरद पवार आणि मोहिते-पाटील यांना पाणीप्रश्न सोडविण्यात सपशेल अपयश आले. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणल्याने त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे,असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी बोलताना केले.
———————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक