उदनवाडी गाव हायटेक होणार असून इंटरनेट सुविधा घरोघरी पोहोचणार – शाहरुख मुलाणी

सांगोला :

सांगोला तालुक्यातील उदनवाडी गावातील सुलेमान मुलाणी यांचे घर हे गावातील पहिले इंटरनेट सुविधा असलेले घर ठरले आहे.गावात इंटरनेट आल्याने हे गांव आता हायटेक होणार असून इंटरनेट सुविधा घरोघरी होणार आहे.त्यासाठी विधानभवन माकप कार्यालय प्रमुख शाहरुख मुलाणी यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

उदनवाडी गावात चलभाष व्यतिरिक्त इतर कोणतेही इंटरनेट चालत नव्हते.त्याअनुषंगाने,सोलापूर जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडे समन्वय साधून त्यांचेशी एअरटेल व जिओ सोबत चलभाष वर बोलून सांगोला येथील संबंधित यंत्रणेद्वारे एअरटेल इंटरनेट व केबल टीव्ही या दोन्हींची सुविधा उदनवाडी गावात वाड्या-वस्तीपर्यंत फायबर वायर इंटरनेट व टीव्ही चॅनलची सुविधा देण्यासाठी विनंती केल्यानुसार आता उदनवाडी येथे ही सुविधा उपलब्ध होणार असल्याने शाहरुख मुलाणी यांचे गावातील प्रतिष्ठीत श्री.वलेकर यांनी अभिनंदन केले व आभार मानले.

उक्त इंटरनेट कंपनीचे ठेकेदार स्वराज कॉम्प्युटर अँड इंटरनेट प्रोव्हायडरचे वैभव मिसाळ व त्यांचे कर्मचारी शिंदे यांनी विशेष कामकाज केले.यासाठी उदनवाडी ग्रामपंचायत सदस्य समीर मुलाणी व अजमीर शेख यांनीही विशेष सहकार्य केले.
यासंदर्भात बोलताना मुलाणी म्हणाले की,इंटरनेट सुविधेसाठी भारत सरकारकडून सुरु असलेल्या कार्याचे कौतुक असून,ग्रामीण भागात ब्रॉडबँडचे जाळे विस्तारणे हे एक आव्हान आहे. डिजिटली सक्षम समाज बनविणे व नागरिकांना ज्ञान आधारित अर्थव्यवस्था बनविण्याच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी भारत सरकार ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमांतर्गत ऑनलाइन सुविधा आणि तळागाळापर्यंत इंटरनेटचे जाळे विस्तारण्यासाठी ठोस काम करीत आहे. इंटरनेट क्षेत्रात ‘५ जी’ मुळे मोठी क्रांती घडून येणार असून टेलिमेडिसिन,शेतीक्षेत्र यांना त्याचा फायदा होणार आहे. इंटरनेटचा दररोजच्या जीवनात कशा पध्दतीने उपयोग होऊ शकेल हे त्यांना पटवून देणार आहे.त्यामुळे गावांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार व उत्पन्न वाढणार आहे. टेलीमेडिसिन,ई-मार्केट,बिझनेस टू बिझनेस सर्व्हिसेस शक्य होणार असून ग्रामस्थांचे आयुष्य सुकर होण्यासाठी इंटरनेट सुविधा प्रकल्पाद्वारे अनेक सरकारी सेवा दिल्या जाणार आहेत.ग्रामीण भागात ब्रॉडबँड सेवेचा प्रसार सुलभ करण्यासाठी आणि ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमातून सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि परवडणाऱ्या किंमतीत हायस्पीड डिजिटल कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी इंटरनेट सुविधा प्रकल्प सुरु केला आहे.संगणक साक्षर समाज निर्माण करुन ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था निर्माण केली जाणार आहे,असे मुलाणी यांनी याप्रसंगी सांगीतले.
—————————————————————————
आयटी हब व पार्कसाठी विशेष प्रयत्न करण्याचा मानस :

सांगोला तालुक्यातील उदनवाडी गांवात आयटी हब व आयटी पार्क करण्यासाठी विविध तज्ञांबरोबर बैठका व चर्चा सुरु असून लवकरच यावर देखील विचारविनिमय होईल,जर असे घडल्यास तालुक्यातील तरुण तरुणींना तालुक्यातच रोजगार उपलब्ध होईल.
                                                  – शाहरुख मुलाणी
———————————————————————————