दीपकआबांच्या प्रयत्नांतून सांगोला नगरपालिकेच्या १३० आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी

सांगोला :

सांगोला नगरपरिषदेकडील आरोग्य विभागातील रोजंदारीवर काम करणार्‍या १३० कर्मचार्‍यांच्या टेंडरची मुदत संपल्याने सांगोला शहरात मागील आठवडा भरापासून गाजत असलेल्या स्वच्छतेच्या विषयांवर माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी यशस्वी शिष्टाई करुन मार्ग काढला असून मुदत संपलेल्या टेंडरची नव्याने प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्वच्या सर्व म्हणजे १३० कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करुन घेवून या कर्मचार्‍यांबरोबरच शहरातील नागरिकांच्या स्वच्छतेचा प्रश्न निकाली काढण्याविषयी त्यांनी काढलेला तोडगा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी मान्य केला आणि आज बुधवारपासून सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्याचे आवाहन त्यांनी केल्याने शहरवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

सांगोला नगरपालिकेतील आरोग्य विभागातील १३० कर्मचार्‍यांच्या टेंडरची मुदत संपल्याने मागील ५-६ दिवसांपासून निर्माण झालेल्या शहराच्या स्वच्छतेच्या व आरोग्य कर्मचार्‍यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी ५ डिसेंबर रोजी सांगोला येथील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील,मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे व चंदन होनराव,शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील,माजी नगरसेवक सतीश सावंत, सोमनाथ लोखंडे,आलमगीर मुल्ला,मधुकर बनसोडे,विनोद रणदिवे यांचेसह अक्षय बनसोडे,कुंदन बनसोडे,महादेव बनसोडे,रवि चौगुले,अमोल सुरवसे आदींसह न.पा.चे कर्मचारी उपस्थित होते.

सांगोला नगरपालिकेतील आरोग्य विभागात काम करणाऱ्या १३० कर्मचाऱ्यांच्या टेंडरची एक वर्षाची मुदत संपल्याने गेल्या ८ दिवसांपासून हे स्वच्छ्ता कर्मचारी घरी बसून होते. हातावर पोट असलेल्या या कर्मचाऱ्यांना कामच उपलब्ध नसल्याने सांगोला शहरातील १३० कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. नवीन ठेकेदार कोण असावा ? किंवा त्याला कधी पासून ठेका द्यावा ? हे नगरपालिका प्रशासनाने पहावे परंतु,आपल्याला पुन्हा कामावर घ्यावे,या मागणीसाठी सर्व १३० कर्मचारी आपल्या मुलाबाळांसह माजी आमदार दिपकआबा यांना भेटले होते.या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी काल मंगळवारी मुख्याधिकारी व आरोग्य विभागातील कर्मचारी यांची एकत्रित बैठक घेऊन नवीन ठेक्याची प्रक्रिया १ महिन्याच्या आत पूर्ण करुन घ्यावी व जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर हजर करुन घेण्याविषयी मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांना सूचित केले.

मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचेशी संवाद साधून माजी आमदार दिपकआबा यांची आग्रही मागणी व कर्मचाऱ्यांची व्यथा याबाबत माहिती दिली आणि नवीन टेंडर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आरोग्य विभागातील सर्व १३० कर्मचाऱ्यांना तात्पुरती मुदत वाढ देण्याची विनंती केली.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही मागणी तात्काळ मान्य करुन कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करुन घेण्याचे आदेश दिल्यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांसह सांगोला शहरातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.
——————————————————————

आरोग्य कर्मचाऱ्यांनी मानले दिपकआबांचे आभार :

नगरपरिषदेकडील आरोग्य विभागातील कर्मचारी कामावर नसल्याने शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.तसेच गेल्या आठवडाभरापासून काम बंद असल्याने १३० कुटुंबांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली होती.मात्र,माजी आमदार दिपकआबांनी हा ज्वलंत प्रश्न तात्काळ मार्गी लावल्याने कर्मचारी व प्रशासनातील संघर्ष संपून पुन्हा आरोग्य विभागातील कर्मचारी कामावर येणार असल्याने सांगोला शहरातील नागरिकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.त्याचबरोबर,आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनीही दिपकआबांचे आभार मानले आहेत.
——————————————————————————