सांगोला :
जागतिक (अपंग) दिव्यांग दिनानिमीत्त दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सांगोला नगरपरिषदे मार्फत सांगोला शहर हद्दीतील दिव्यांग बांधवांचा यथोचित सन्मान करुन सोमवारी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आल्याची माहिती सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.सुधीर गवळी यांनी दिली.
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सन १९९२ मध्ये जागतिक (अपंग) दिव्यांग दिन जाहीर करण्यात आला. तेंव्हापासून दरवर्षी ३ डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तींबाबत सर्वसामान्य जनतेत (समाजामध्ये) जनजागृती निर्माण व्हावी,जेणेकरुन दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी याची मदत होईल. समाजातील प्रत्येक घटकांनी दिव्यांगांच्या प्रति,केवळ सहानुभूती न दाखवता त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे.जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तींच्या समस्या समजावून घेता याव्यात,याबाबत समाजात जनजागृती व्हावी,अपंगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उध्दारासाठी मदत मिळावी म्हणून या दिवसाची योजना आहे.
सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्ती देखील सहजतेने कार्य करु शकतात. दिव्यांगत्वावर मात करुन यशस्वी होता येते. यासाठी त्यांना प्रोत्साहनाची गरज असते.त्यानिमित्त समाजामध्ये जनजागृती व्हावी, यासाठी ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये विविध क्रीडा स्पर्धा,प्रभात फेरी,व्याख्याने,भाषण अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन दिव्यांग व्यक्तींचा सन्मान केला जातो.
सांगोला नगरपरिषदे मार्फत आयोजित सदर कार्यक्रमात उपस्थित दिव्यांग बांधवांचा श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांशी चर्चा करुन त्यांच्या मागण्या,समस्या व अडचणी यांवर चर्चा करण्यात आली.या कार्यक्रमास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.सुधीर गवळी, कार्यालयीन अधीक्षक स्वप्निल हाके,कर निरीक्षक रोहित गाडे,प्रहार जनशक्तीचे सांगोला तालुका अध्यक्ष नवीद पठाण,अमोल लऊळकर,तय्यब बागवान तसेच शहरातील सर्व दिव्यांग बंधू व भगिनी उपस्थित होते——————————————————————————
दिव्यांग बांधवांना फक्त सहानुभूतीची नव्हेतर, आपुलकीची गरज आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येणे गरजेचे असून,दिव्यांग बांधवांच्या जीवनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी सांगोला नगरपरिषद कायम प्रयत्नशील राहील.
– मुख्याधिकारी डाॅ.सुधीर गवळी
——————————————————————————
More Stories
आपुलकी प्रतिष्ठानचा गुंफण सामाजिक पुरस्काराने गौरव
स्व.आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या जयंती निमीत्त बुधवारी जवळा येथे समाधी दर्शन सोहळा
कर्करोग तपासणी व जनजागृतीसाठी सांगोल्यात रोटरी क्लबने काढली रॅली