पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडून प्रा.अमित घाटूळे यांचे अभिनंदन

 

सांगोला :

                     “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमात सहभाग घेवून आपले मतप्रदर्शन केल्याबद्दल सांगोला येथील प्रा.अमित उत्तमराव घाटूळे यांना नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन व शुभेच्छापत्र प्राप्त झाले असून त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

सध्या,सर्वत्र लागू असणारा १०+२+३ हा अभ्यासक्रम बंद होणार असून सन २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम व पॅटर्न राबविला जाणार आहे.केंद्रीय शैक्षणिक धोरणास अनुसरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातून अनेक शिक्षक व प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला होता.या कार्यक्रमात प्रा.अमित यांनी देखील सहभाग घेवून मतप्रदर्शन केले होते.प्रा.अमित यांनी मतप्रदर्शन केल्याबद्दल मोदी यांनी त्यांचे याद्वारे अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व शिक्षकांनी केलेल्या सूचनांचा आदर व स्वीकार करून भारताच्या शतक महोत्सवी स्वातंत्र्य दिन वर्षापर्यंत भारत एक गौरवशाली राष्ट्र बनेल,असा आशावाद मोदी यांनी यामध्ये व्यक्त केला आहे.सन २०४७ साली भारतीय स्वातंत्र्याचा शंभरावा वर्धापन दिन आहे.त्यावेळी भारताचा संपूर्ण जगात दबदबा असेल व त्यासाठी आपणासारख्या शिक्षकांचे संस्कार व योगदान महत्वाचे असणार आहे,असे मोदी यांनी सदर पत्रात म्हंटले आहे.

                   प्रा.अमित घाटुळे हे सांगोला विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा.उत्तमराव घाटूळे यांचे सुपुत्र असून ते सध्या पुणे जिल्ह्यात नवोदय विद्यालयात अध्यापन करत आहेत.ते क्रीडा शिक्षक असून शिक्षण शास्त्र (क्रीडा) परीक्षेत सोलापूर विद्यापीठात सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले आहेत. यापूर्वी सांगोला महाविद्यालयातही क्रीडा शिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे.
—————————————————————————