सांगोल्याच्या वंदे मातरम् चौकातील अतिक्रमणाबाबत आनंदा मानेंचे १ मेला उपोषण

 

सांगोला :

सांगोला शहरातील वंदे मातरम् चौक ते चिंचोली रोड आरक्षण क्र. ४७ बगीचापर्यंतचे अतिक्रमण त्वरीत काढावे अन्यथा, दि.१ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून सांगोला नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती माजी नगरसेवक आनंदा माने यांनी दिली.

शहरातील वंदे मातरम् चौक ते चिंचोली रोड आरक्षण क्र. ४७ बगीचापर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूला विविध हातगाडे व शेडनेट मारुन कांही लोकांनी अनधिकृतरित्या अतिक्रमण केलेले आहे.या अतिक्रमणामुळे या परिसरातील वाहतूकीस अडथळा निर्माण होत असून बर्‍याचवेळा नागरिकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. तसेच या चौकानजिक असलेले रेल्वेगेट पडल्यानंतर तर, मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी निर्माण होत असून लवकरात लवकर सदरचे अतिक्रमण काढून घ्यावे,यासाठी सांगोला नगरपरिषद प्रशासन यांच्याशी लेखी पत्रव्यवहारही केला होता.

परंतू,नगरपरिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी मात्र या अतिक्रमण संदर्भात,कोणतीच ठोस पावले उचलत नसल्याने नाईलाजास्तव वंदे मातरम् चौक ते चिंचोली रोड आरक्षण क्र. ४७ बगीचापर्यंतचे अतिक्रमण त्वरीत काढावे, यासाठी दि.१ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून सांगोला नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे माजी नगरसेवक आनंदा माने यांनी सांगीतले.
—————————————————————————