राजकीय

आम.रविंद्र धंगेकर यांचा शरद पवार यांच्या हस्ते ७ मे ला सांगोल्यात होणार भव्य सत्कार

 

सांगोला :
               सुमारे तीस वर्षापासून भाजपचा गड मानला जात असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून व हा गड काबीज करुन “जाॅईंट किलर” ठरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार व नुतन आमदार रविंद्र धंगेकर यांचा महाराष्ट्र राज्य लोणारी समाज व सांगोला तालुका लोणारी समाज सेवा संघाच्या वतीने दि.७ मे रोजी सांगोला शहरात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते भव्य सत्कार समारंभ संपन्न होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

आ.रविंद्र धंगेकर हे अखिल लोणारी समाज सेवा संघाचे अध्यक्ष असून लोणारी समाजामध्ये त्यांना प्रचंड मानाचे स्थान आहे.संपूर्ण महाराष्ट्रात लोणारी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून पश्चिम महाराष्ट्रातील विशेषत्वाने माणदेश पट्ट्यात लोणारी समाजाची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे.कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवून आ.रविंद्र धंगेकर हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले.सर्वत्र चर्चिले गेलेल्या या निवडणुकीत धंगेकरांनी घवघवीत विजय खेचून आणल्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील लोणारी समाजात आनंदाचे वातावरण तयार झाले व एक जोश निर्माण झाला आहे.समाजाचे प्रश्न विधिमंडळामध्ये मांडणारा आपल्या समाजातील नेता असावा, ही या समाजाची गेली अनेक वर्षापासूनची इच्छा आ.धंगेकरांच्या रुपाने पूर्ण झाली आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात लोणारी समाजाची लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे.शिवाय सर्व समाज बांधवांना सांगोला हे ठिकाण मध्यवर्ती होत असल्यामुळे या तालुक्यात आ.धंगेकरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्याची तयारी महाराष्ट्र राज्य लोणारी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.आमदार धंगेकरांनी जे यश खेचून आणले आहे,त्यास साजेसा असाच त्यांचा सन्मान करण्याचे समाजाने ठरविले असून तशी जोरदार तयारीही केली आहे.या सन्मान सोहळ्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्याकडे संपूर्ण लोणारी समाजाच्या वतीने पवार साहेबांच्या हस्ते आम.रवींद्र धंगेकर यांचा सत्कार व्हावा,ही इच्छा व्यक्त केल्यानंतर दिपकआबांसह लोणारी समाजाच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांची नुकतीच भेट घेवून त्यांना या सत्कार सोहळ्याचे निमंत्रण दिले.

याप्रसंगी,शरद पवार यांनी लोणारी समाजाचे आपल्या व पक्षाच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान असल्याचे कबुल केले. या समाजाबद्दल आपणास सुरुवातीपासूनच जिव्हाळा व प्रेम असल्याचे सांगून बारामती मतदार संघातील सुरुवातीच्या काळातील सवंगडी लोणारी समाजाचे नेते नाथा गिते यांनी शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीतील दिलेल्या योगदानाची प्रशंसा करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला.लोणारी समाजाने दिलेले हे निमंत्रण शरद पवार यांनी मोठ्या आनंदाने स्वीकारले असून दि.०७ मे रोजी हा भव्य सोहळा करण्याचे सुनिश्चीत करण्यात आले आहे.

कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्यावर संपूर्ण लोणारी समाजाचे खूप प्रेम होते. त्यानंतर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांचेवर सुध्दा लोणारी समाजाचे खूप प्रेम आहे.म्हणून तोच वसा पुढे चालू ठेवत या समाजाला कायम न्याय देण्याचा प्रयत्न दिपकआबांनी केला आहे. यावेळी,दिपकआबांच्या सोबत लोणारी समाजाच्या शिष्टमंडळामध्ये नवनाथ राणगट (नगरसेवक, पंढरपूर) नामदेवराव बजबळकर,विलास घेरडे सर,भिमराव घेरडे सर,इंजि.अशोक नरळे (फलटणे),गणपत महांकाळ, विजय भुत्ता आदी लोणारी समाज बांधवांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या पुढाकाराने आ.रवींद्र धंगेकर यांच्या नागरी सत्काराला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांची वेळ मिळाल्यामुळे समस्त लोणारी समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button