मालमत्ता कर,पाणीपट्टी व जागा भाडेपोटी सांगोला नगरपरिषदेची विक्रमी वसुली

 

सांगोला :

मालमत्ता कर,पाणीपट्टी,इमारत व जागा भाडेपोटी आर्थिक वर्ष २०२२- २३ मधील एकूण १० कोटी ५८ लाख मागणीपैकी सांगोला नगरपरिषदेच्या वतीने तब्बल ७ कोटी रुपयांची विक्रमी वसूली करण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील २ वर्षापासून सांगोला शहरातील नागरिक व व्यापारी हे नाजूक अशा आर्थिक परिस्थितीतून जात होते. त्यामुळे नगरपरिषदेची कर वसुलीही थंडावली होती.नगरपरिषदेमार्फतही विशेष अशी वसुली मोहीम घेण्यात आली नव्हती. स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने विशेष वसुली मोहीम राबवून जास्तीत कर वसुली होणे आवश्यक असते. त्यामुळे कोरोना महामारीला तोंड देऊन सर्व नागरिक व व्यापारीवर्ग आता स्थिरस्थावर झाल्यानंतर चालू वर्षी नगरपरिषदेमार्फत वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम हाती घेण्यात आली होती. या वसुली मोहिमेअंतर्गत नगरपरिषदेच्या कर विभागाकडील तब्बल १६ कर्मचारी व पाणीपुरवठा विभागाकडील कर्मचारी यांचेमार्फत थकबाकीदारांना लक्ष्य करुन कर भरणा करण्याबाबत नोटिसा देणे, वारंवार पाठपुरावा करणे,वेळप्रसंगी पाणीपुरवठा खंडित करणे,गाळे सिल करणे,मालमत्तांना जप्तीपूर्व नोटिसा देणे यासारखी कारवाई करण्यात आली.त्यामुळे,नगरपरिषदेकडून सुरु असलेल्या या विशेष वसुली मोहिमेला नगरपरिषद हद्दीतील नागरिक व व्यापार्‍यांनीही तितक्याच चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला.एक सुजाण नागरिक म्हणून सर्वांनी कर भरणा करुन नगरपरिषदेस सहकार्य केले.अद्यापही बरेचसे थकबाकीदार असून त्यांचेमार्फत कर भरणा करणेसाठी नगरपरिषद प्रयत्नशील आहे.थकबाकी रकमेवर महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार मासिक २% दंडाची आकारणी केली जाणार असल्याने थकबाकीदारांनी लवकरात लवकर आपला थकीत कर भरणा करावा,असे आवाहन  मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी केले आहे.

सदर वसुली मोहीम यशस्वीपणे राबवून विक्रमी वसुली करण्यासाठी मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक व लेखापाल विजयकुमार कन्हेरे,कर निरीक्षक तृप्ती रसाळ, सहा. मालमत्ता पर्यवेक्षक स्वप्निल हाके,पाणीपुरवठा विभागाचे अभियंता इंजि.तुकाराम माने,लेखापरीक्षक जितेंद्र गायकवाड, सेवानिवृत्त कर्मचारी सूर्यकांत रणदिवे तसेच पाणीपुरवठा व कर विभागा कडील सर्वच कर्मचार्‍यानी विशेष परिश्रम घेतले.

कर भरणा करावा व दंडात्मक कारवाई टाळावी :

              सांगोला शहरातील अनेक सुजाण नागरिक व व्यापार्‍यांनी कर भरणा करुन नगरपरिषदेस सहकार्य केले असून अजूनही थकबाकी असणाऱ्या मालमत्ता धारकांकडून वसुलीसाठीची मोहीम ही सुरुच राहणार आहे. थकबाकी न भरणाऱ्यांसाठी मासिक २% दंडाची कारवाई टाळण्याची ही शेवटची संधी असून सर्व थकीत मालमत्ताधारकांनी लवकरात लवकर कर भरणा करावा व दंडात्मक कारवाई टाळावी.                                                – मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी
               ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

नगरपरिषदेकडील २०२२-२३ मधील एकूण मागणी व झालेली वसुली :

मालमत्ता कर :                                                          * एकूण मागणी – ४ कोटी ९० लाख रुपये                    * एकूण वसुली – ३ कोटी १० लाख रुपये                        पाणीपट्टी :                                                            * एकूण मागणी – ३ कोटी ८२ लाख रुपये                    * एकूण वसुली – २ कोटी ९० लाख रुपये                  इमारत व गाळा भाडे :                                                 * एकूण मागणी – १ कोटी ८६ लाख रुपये                   * एकूण वसुली – १ कोटी रुपये

            वरीलप्रमाणे एकूण मागणी १० कोटी ५८ लाख रुपयांपैकी चालू वर्षी सांगोला नगरपरिषदेने तब्बल ७ कोटी रुपयांची विक्रमी वसूली केली.
—————————————————————————