राजकीय

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अखेर मंजूर

 

सांगोला :
संपूर्ण राज्यात मोठ्या चवीने चर्चिले गेलेल्या भाजपचे सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख व निर्मला यादव प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती अनुजा प्रभू देसाई यांनी श्रीकांतदादा देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अखेर गुरुवारी मंजूर केल्याची माहिती उच्च न्यायालयातील श्रीकांतदादाचे विधीज्ञ श्री.आशिष गायकवाड यांनी दिली.

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी लग्न करतो म्हणून आशा दाखवून आपली मोठी फसवणूक केल्याची तक्रार त्यांच्याच नात्यातील निर्मला यादव या महिलेने पोलीस स्टेशनला देवून आणि सोशल मिडिया वरुनही अनेक आरोप करुन सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडवून दिली होती.त्यामुळे, श्रीकांतदादा देशमुख यांची मोठी नामुश्की होवून त्यांना तातडीने जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.त्यानंतरही,सदर महिला गप्प न राहता श्रीकांतदादा तसेच भाजपचे वरिष्ठ नेतेमंडळी यांचे विरोधात सातत्याने सोशल मिडियाद्वारे गंभीर आरोप करत होती.दरम्यान, श्रीकांत दादा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर येथील जिल्हा न्यायालयाने नाकारल्यानंतर जामीनासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

अटकपूर्व जामीनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी १६ मार्च रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान श्रीकांतदादांच्या वतीने वरीष्ठ विधीज्ञ श्री.शिरीष गुप्ते,श्री.आशिष गायकवाड व श्री.उज्वल अंगदसुर्वे यांनी केलेला युक्तीवाद मान्य करुन जामीन अर्ज मंजूर करत दिलेल्या आदेशात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती अनुजा प्रभू देसाई यांनी म्हंटले की,अर्जदार हे विवाहीत असल्याची पूर्ण जाणीव व कल्पना तक्रारदार महिलेस पहिल्यापासूनच होती तरीही, आपसातील प्रेमसंबंध हे संमतीनेच ठेवले आणि तक्रार दाखल करेपर्यंत हे संबंध टिकून होते.तसेच तक्रारदार महिला व अर्जदार या दोघांमधील सन २०१८ पासूनचे एकमेकांचे नातेसंबंध व जुनी मैत्री लक्षात घेता,अशा स्वरुपाच्या घटनेत बलात्कारासारखा गुन्हा केला,असे म्हणता येणार नाही,असे मत नोंदवत न्यायाधीशांनी अटकपूर्व जामीनअर्ज मंजूर केल्याचा आदेश दिला.

बलात्काराचा आरोप झाल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडवणार्‍या या प्रकरणात श्रीकांतदादा देशमुख व त्यांच्या कुटूंबियांची राजकिय व सामाजिक कारकिर्द चांगलीच पणाला लागली होती.परंतु,आता मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाल्याने देशमुख कुटूंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button