महत्वाच्या बातम्या

सांगोल्यात संपकरी कर्मचाऱ्यांनी काढली “पेंशन जागृती रॅली”

 

सांगोला :

         “मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही,जुनी पेन्शन योजना लागू करा” अशा घोषणा देत,संपकरी कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवत,आपल्या संपाची दाहकता तीव्र करण्यासाठी काल सांगोला शहरातील म.फुले चौक ते पंचायत समिती प्रांगणापर्यंत “पेंशन जागृती रॅली” काढली.शासकीय व निमशासकिय तसेच विवीध विभागातील सुमारे साडे तीन हजाराहून अधिक कर्मचारी व शिक्षक या ‘पेंशन जागृती रॅलीत’ सहभागी झाले होते. रॅलीच्या दरम्यान संपकर्‍यांनी सांगोला शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत शासनाबरोबर जनतेचेही लक्ष वेधून घेतले.

सांगोला तालुक्यातील सर्व राज्यशासकीय व निमशासकीय कर्मचारी संघटना,जि.प.कर्मचारी व शिक्षक हे सध्या नवीन पेन्शन योजना रद्द करुन पूर्वीप्रमाणेच जुनी पेन्शन योजना सुरु करणे,वेतनत्रृटी दूर करणे व कंत्राटी कर्मचारी यांना शासन सेवेत कायम करणे,या प्रमुख तीन मागण्यांसाठी दि.१४ मार्च पासून पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात सामील झाले असून या संपाची दाहकता तीव्र करण्यासाठी काल एकत्रित येऊन सांगोला शहरातील प्रमुख मार्गावरुन त्यांनी रॅली काढली. महात्मा फुले चौक ते सांगोला पंचायत समिती पर्यंत पेंशन जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीत सर्व विभागातील सुमारे साडे तीन हजार ते चार हजार कर्मचारी व शिक्षक या रॅलीत सहभागी होते.’पेंशन जागृती रॅलीत’ घोषणा देवून मागण्या मान्य होईपर्यंत संप बेमुदत सुरुच ठेवण्याचा निर्धार यावेळी संपकऱ्यांनी केला.

यावेळी जि.प.कर्मचारी महासंघ, जुनी पेन्शन संघटना,लिपीक वर्गीय कर्मचारी संघटना,ग्रामसेवक युनियन, आरोग्य कर्मचारी युनियन,प्राथमिक व माध्यमिक सर्व शिक्षक संघटना, जि.प.कर्मचारी युनियन,अभियंता संघटना,लेखा कर्मचारी संघटना, अंगणवाडी पर्यवेक्षिका संघटना, वाहन चालक संघटना,परिचर संघटना या सर्व संघटनांचे पदाधिकारी,तालुका समन्वय समितीचे प्रतिनिधी तसेच कर्मचारी बांधव यावेळी उपस्थित होते.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button