सांगोला शहराच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न दीपकआबांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागला – माजी नगरसेवक विजय राऊत

 

सांगोला :

     नीरा उजवा कालवा फाटा क्रं.५/५ च्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या सांगोला शहराच्या पश्चिम भागातील जनावरांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाणीप्रश्नाबाबत माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन तातडीने पाणी सोडण्याच्या सूचना दिल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात असल्याची माहिती माजी नगरसेवक विजय राऊत यांनी दिली.

नीरा उजवा कालवा फाटा क्रं.५ साठी दि ४ मार्च रोजी पाणी सोडण्यात आले होते. तथापि सदरचे पाणी अवघ्या चारच दिवसात बंद करण्यात आल्याने फाटा क्रं.५/५ वरील संस्था लाभ क्षेत्रातील चांडोले वाडी,देशमुख वस्ती,तळ्यातील (राऊत मळा) तसेच फुलेनगर व राऊत मळा येथील शेतकऱ्यांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता.याबाबत या लाभक्षेत्रातील माजी नगरसेवक विजय राऊत यांचेसह सर्व शेतकऱ्यांनी माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांची भेट घेवून होणाऱ्या नुकसानी बाबत व्यथा मांडली होती. यावर शेतकरी व मुक्या जनावरांचे होणारे हाल लक्षात घेवून दीपकआबा यांनी नीरा उजवा कालवा पंढरपूर विभागाचे उपअभियंता श्री.ताटी व संबंधित शाखा अभियंता यांना तातडीने बोलावून घेऊन शेतकऱ्यांसमवेत त्यांच्याशी चर्चा घडवून आणत सदरचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावून तात्काळ पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या.अधिकाऱ्यांनी दीपकआबांच्या सूचनेची दखल घेऊन फाटा क्रं.५/५ च्या लाभक्षेत्रातील चांडोले वाडी,देशमुख वस्ती,तळ्यातील (राऊत मळा) तसेच फुलेनगर व राऊत मळा परिसरातील तलाव भरून दिल्याने येथील शेतकऱ्यांनी दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या कार्यतत्परते बाबत समाधान व्यक्त करत आभार प्रकट केल्याचे विजय राऊत यांनी सांगीतले.

—————————————————————————