सांगोला :
सांगोला तालुक्याचा विकास हाच आमचा ध्यास असून मागील ५० वर्षात जो विकास झाला नाही तो, येत्या काळात करुन दाखवायचा आहे आणि यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. मागील दोन अडीच वर्षाच्या काळात सांगोला तालुक्याला ७०० ते ८०० कोटी रुपयांचा निधी मिळाला असून येत्या काळात आणखी मोठा निधी उपलब्ध करुन देऊ व तालुक्याचा सर्वांगीण विकास करु असे सांगत, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मांजरी गांवचे योगदान महत्त्वाचे आहे. या गांवाने कायमस्वरुपी भरभरुन सहकार्य केले असून मांजरी गांवाबद्दल आमच्या अंत:करणात वेगळाच आदर आहे. यामुळे गांवच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही तसेच या गांवच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी मांजरी येथे बोलताना दिली.
सांगोला तालुक्यातील मांजरी ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ तथा उदघाटन समारंभ आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, शिरभावीचे माजी सरपंच अभिजीत दादा नलवडे,शिवणे ग्रा.पं.चे सरपंच दादासाहेब घाडगे,धायटी ग्रा.पं.सदस्य गणेश कदम यांच्यासह मांजरीच्या सरपंच सौ.मंगल मधुकर भुसे, उपसरपंच कौशल्या वसंत कांबळे तसेच गांवातील ज्येष्ठ नागरिक,आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते,पोलीस पाटील,तंटामुक्त समितीचे आजी-माजी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मकर संक्राती सणाचे औचित्य साधून यावेळी मांजरी ग्रामपंचायत तसेच आबा-बापू गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने निराधार महिलांना आपुलकीची साडी देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना आ.शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की, मांजरी हे गांंव कार्यतपस्वी आम.काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या खात्रीचे व विश्वासाचे गांव आहे. या गांवाविषयी आमच्या अंत:करणात वेगळा आदर आहे. तालुक्याचे नेतृत्व करणारे शिनगारे साहेब व तालुक्याच्या राजकीय चळवळीत अग्रेसर नांव असलेल्या जगताप यांचे हे गांव आहे. दलित चळवळीतही विचार करण्यासारखे काम करणारे हे गांंव आहे. या गावातील माणसं विचाराने भारावून गेलेली आहेत. तुमचा विचार आणि आमचा विचार याची सांगड घालून आपण गांव व तालुक्याचा सर्वांगीण विकास करुया.पूर्वीपासूनच रोजगार हमीचा,पाणी नसलेला व दुष्काळी तालुका म्हणून असलेली सांगोला तालुक्याची ओळख येत्या दोन वर्षाच्या काळात पुसून काढल्याशिवाय राहणार नाही,असा विश्वास देत, लोकप्रतिनिधी,सरपंच उपसरपंच यांच्यावर जेवढी जबाबदारी आहे,तेवढीच जबाबदारी गांवातील ग्रामस्थांची देखील आहे. नागरिकांनी आपल्या आडीअडीचणी सविस्तरपणे लोकप्रतिनिधींसमोर मांडाव्यात व त्या सोडवून घेण्यासाठी देखील पाठपुरावा करणे गरजेचे आहे. जनतेच्या अडचणी सोडवणे हे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचे कर्तव्य आहे. लोकांनी मतदानाच्या स्वरुपात दिलेल्या आशीर्वादाची जाणीव ठेवून आम्ही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी काम करत आहोत. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आत्तापर्यंत निधी कमी पडू दिला नाही व यापुढेही कमी पडू देणार नाही,असा विश्वासही आम.शहाजीबापू पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
यावेळी बोलताना दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले की, मागील दोन ते अडीच वर्षापूर्वी सांगोला तालुक्याचा विकास साधत असताना, दुष्काळी तालुका अशी ओळख होती परंतु आता टँकर मुक्त तालुका,अशी ओळख निर्माण केली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नव्याने योजना मंजूर केली आहे. शिरभावी योजनेचे नूतनीकरण करण्याचे काम सुरु आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचाही प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला आहे. विकासाचे नवीन पर्व सांगोला तालुक्याला या निमित्ताने सुरू झाले आहे. मांजरी ग्रामपंचायतच्या वतीने केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही निश्चितपणे कटिबद्ध आहोत.दरम्यान, विकासाच्या योजना राबवत असताना कामाचा दर्जा उत्तम क्वाॅलिटीचा वापरून अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः लक्ष घालून गांवचा सर्वांगीण विकास करावा,असेही दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी सांगितले.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार म्हणाले, सांगोला तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असताना, तालुक्याला कधी निधी कमी पडला नाही. यापुढेही मांजरी गांवाच्या सर्वांगीण विकासासाठी भरभरून निधी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, गांवच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी सरपंच,उपसरपंच तसेच पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन पुढाकार घ्यावा आणि आपले गांव विकासाच्या मार्गावर घेऊन जावे,असे मत त्यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच भाऊसाहेब जगताप यांनी केले तसेच माजी सरपंच अशोक शिनगारे यांनी कांही मागण्या मांडल्या. तर माजी सरपंच अमृत उबाळे व सचिन शिनगारे यांनीही मागण्यांचे निवेदन दिले.
—————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक