राजकीय

ठाकरेंच्या पक्षाचं नांव आता “शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे” तर,शिंदे गटाच्या पक्षाचं नांव “बाळासाहेबांची शिवसेना” 

मुंबई :

 अंधेरी पोटनिवडणुकीच्या पूर्वी निवडणूक आयोगाने चिन्हाबाबत तातडीनं निर्णय घ्यावा,अशी मागणी शिंदे गटाने केली होती. दोन्ही गटांकडून कागदपत्रे सादर करण्यात आल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण हे मुळ चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना नवी नांवे आणि चिन्ह सादर करण्यास सांगितले होते. उद्धव ठाकरे यांच्या गटाने “शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे” ही तीन नावे दिली होती. तर चिन्ह म्हणून “त्रिशुल, उगवता सूर्य आणि मशाल” हे चिन्ह आयोगाला दिले होते. त्यानुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” हे नांव दिले आणि “मशाल” हे चिन्ह दिले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं प्रतीक हे हाती मशाल धरलेला कामगार आणि शेतकरी असे असून उध्दव ठाकरे यांना मशाल चिन्ह मिळाल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे नवे चिन्ह पोहोचवण्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असे शिवसैनिकांचे मत आहे.  तर दुसरीकडे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला “बाळासाहेबांची शिवसेना” हे नाव देण्यात आले असून त्यांनी दिलेली त्रिशुल, उगवता सूर्य आणि गदा ही चिन्हे आयोगाकडून नाकारण्यात आली आहेत आणि चिन्हासाठी नवीन पर्यायी नांवे देण्यास सुचवले आहे.

                  “मशाल” चिन्ह तिसरा पसंतीक्रम :

उद्धव ठाकरे यांच्याकडून “त्रिशुल, उगवता सूर्य आणि मशाल” ही तीन चिन्हे देण्यात आली होती. ठाकरे गटाने दिलेल्या तिसऱ्या स्थानावर असलेले “मशाल” हे चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळाले. मशाल हे चिन्ह यापूर्वी एका राजकीय पक्षाकडे होते मात्र, त्या पक्षाचा जनाधार कमी झाल्याने ते चिन्ह खुले झाले होते. ते आता उद्धव ठाकरे यांच्या नव्या पक्षाला देण्यात आले आहे.

शिवसेना आणि मशालीचं जुनं नातं :

शिवसेना पूर्वी नोंदणीकृत पक्ष नव्हता. त्यामुळं शिवसेनेला १९८९ मध्ये धनुष्यबाण चिन्ह मिळाले होते. त्यापूर्वी शिवसेनेच्या उमेदवारांची नोंद अपक्ष म्हणून व्हायची. १९८५ साली छगन भुजबळ हे मशाल चिन्हावर विधानसभेत निवडून गेले होते. तर, औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील सेनेचा पहिला खासदार देखील मशाल चिन्हावर निवडून आला होता, असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेना पुरस्कृत मोरेश्वर सावे “मशाल” चिन्हावरच खासदार झाले होते. शिवसेनेने यापूर्वी ढाल तलवार, रेल्वे इंजिन, उगवता सूर्य, या विविध चिन्हांचा वापर निवडणूकीत केला होता.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला “बाळासाहेबांची शिवसेना” हे नांव दिले आहे. तर, त्यांनी दिलेली त्रिशुल, उगवता सूर्य आणि गदा हे चिन्ह नाकारले असून चिन्हासाठी नवीन पर्यायी नांवे देण्याबाबत सुचवले आहे आणि शिंदे गटाला कदाचित आज नवीन चिन्ह मिळू शकेल.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button