ईद-ए-मिलादुन्नबी : मोहम्मद पैगंबर (स्वल्लल्ल्लाहू अलैही वसल्लम) यांचे जयंतीनिमीत्त

 

मुस्लिम धर्माचे संस्थापक व प्रेषित मोहम्मद पैगंबर (स्वल्लल्ल्लाहू अलैही वसल्लम) यांचा जन्म २० एप्रिल (१२ रब्बीलअव्वल) ५७१ मध्ये अरब देशातील पवित्र मक्का शरीफ (सौदी अरेबिया) या शहरात कुरैश या कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नांव हजरत अब्दुल्लाह आणि आईचे नांव हजरत आमिना होते. मोहम्मद या शब्दाचा इस्लाम मधील अर्थ आदरणीय असा होतो. मोहम्मद पैगंबर हे अवघ्या सहा वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. पुढे त्यांचा सांभाळ त्यांच्या काकांनी केला. मोठे झाल्यानंतर व्यापारी म्हणून त्यांनी चांगला नावलौकीक कमावला.

पण, नंतर ते सार्‍या जीवनाला कंटाळून गेले. त्यांना आस लागली होती ती आत्मिक सुखाची. त्याचा शोध घेण्यासाठीच ते जवळच्याच गुहेत गेले. तेथे ध्यानधारणा करून त्यांनी आपल्या मनाचा तळ गाठला. गुहेतील हे वास्तव्य साक्षात्कारास कारणीभूत ठरले. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांना ईश्वरी साक्षात्काराचा पहिला अनुभव आला आणि त्यांचे अवघे जीवनच बदलून गेले. साक्षात्कारानंतर तीन वर्षांनी त्यांनी प्रवचने द्यायला सुरवात केली.जगात देव एकच आहे आणि त्याला पूर्णपणे शऱण जा, हा संदेश त्यांनी दिला. आपण ईश्वराचे प्रेषित असून आदम, नोहा,मोझेस,डेव्हीड,येशू याच परंपरेतील आपण आहोत,असे सांगायला सुरवात केली.

त्यांच्या प्रवचनांचा लोकांवर प्रभाव पडू लागला. त्यांचा शिष्यवर्ग हळूहळू तयार होऊ लागला. पण मक्केतील काही टोळ्यांना त्यांचा संदेश मान्य नव्हता. त्यांनी मोहम्मद पैगंबरांना त्रास द्यायला सुरवात केली. अखेरीस मोहम्मद पैगंबरांनी त्यांच्या शिष्यांना घेऊन जवळच्याच मदिनेला स्थलांतर केले. ही घटना घडली ती, इसवी सन ६२२ मध्ये. मुस्लिमांमध्ये या वर्षाला मोठे महत्त्व आहे. कारण या वषार्पासून त्यांचे नववर्ष (हिजरी) सुरू होते.मदिनेला गेल्यानंतर मोहम्मद पैगंबरांनी तेथील टोळ्यांना एकत्रित करायला सुरवात केली व त्यांच्यात आपली शिकवण रूजवली. त्यामुळे तेथे त्यांना मोठा शिष्यवर्ग मिळाला. पुढे या टोळ्यांना एकत्रित करून त्यांच्या मदतीने त्यांनी इसवी सन ६३२ मध्ये मदिनेचा ताबा घेतला.

त्यांनी परिसराची तीथर्यात्रा करून आपला संदेश दिला. नंतर मदिनेत परतल्यानंतर अतिश्रमामुळे ते आजारी प़डले. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधना पर्यंत मात्र जवळपास सर्व अरेबियन राष्ट्रे मुस्लिम झाले होती. मोहम्मद
पैगंबरांना सातत्याने अगदी त्यांच्या मत्यूपर्यंत साक्षात्कार होत होते. या साक्षात्कारी संदेशांना मिळूनच मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ “कुराण शरीफ” तयार झाला आहे.मोहम्मद
पैगंबरांना नबी म्हणजे प्रेषित आणि रसूल म्हणजे देवदूत असेही म्हटले जाते. कुराणात तर त्यांचा उल्लेख अहमद म्हणजे अधिक आदरणीय असा केला आहे.

जगाला दाखविला सत्याचा मार्ग :

हजरत मुहम्मद पैगंबर (स्वल्लल्ल्लाहू अलैही वसल्लम) यांच्या जन्मापूर्वी अरब देशातील जनतेवर अत्याचार होत होते. अज्ञानापायी अरब लोक मुलगी जन्माला आली तर, तिला जिवंत दफन करत असत. स्त्रियांचा व विधवांचा छळ करून त्यांच्यावर अत्याचार केले जात असत. मुहम्मद पैगंबर यांच्यामुळे अत्याचाराचे हे पर्व संपुष्टात येण्यास प्रारंभ झाला.विधवा स्त्रियांवर होत असलेले अत्याचार थांबविण्यासाठी त्यांनी आपल्या वयापेक्षा अधिक वय असलेल्या उम्मूल मोमिनुल हजरत खदीजतुल कुबरा या नांवाच्या विधवेशी लग्न केले. इतरांना मार्गदर्शन, उपदेश व आदेश करण्यापूर्वी सर्वप्रथम स्वतः आचरण करणे, हा त्यांचा विशेष स्वभावगुण होता. मनमिळावू, सभ्यता, विनम्रता, प्रेमळ स्वभाव, शत्रूंना माफ करणे, द्वेषभावना न बाळगणे आदी विशेष गुण त्यांच्यात होते. त्यांच्या तोंडून विरोधकांविषयी कधीही अपशद्ब निघाले नाही. उलट, ते त्यांच्याशी प्रेमानेच वागले, बोलले. सर्वश्रेष्ठ अल्लाह तआलाच या सृष्टीचा निर्माता आहे. त्याच्याइतका कोणीही श्रेष्ठ नाही, असे ते आपल्या प्रवचनातून उपदेश करीत असत. कितीही कठीण प्रसंग आले, तरी सत्याचा मार्ग सोडायचा नाही, असे ते सांगत. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप (परदा) घेतला. त्यांनी दाखवून दिलेला सत्याचा मार्ग, त्यांनी केलेल्या उपदेशांवर प्रामाणिकपणे आचरण व त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा संकल्पच मोहम्मद पैगबरांप्रती खरी श्रद्धा ठरेल. तसेच त्यांचा सच्चा अनुयायी होण्याचा गौरव प्राप्त होईल आणि एका अर्थाने मुहम्मद पैगंबर यांची जयंती साजरी करण्याचे सार्थक होईल.
—————————————————————————