सामाजिक

विद्यार्थ्यांना मोबाईल व समाज माध्यमांपासून दूर ठेवणे ही काळाची गरज – सहाय्यक प्रांतपाल डॉ.कैलास करंडे

सांगोला रोटरी क्लबच्या राष्ट्रशिल्पकार पुरस्कारांचे वितरण उत्साहात संपन्न

सांगोला :

आजच्या डिजिटल युगात शिक्षकांची जबाबदारी अत्यंत मोठी आहे.विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देणे पुरेसे नसून त्यांना संस्कार,मूल्ये आणि योग्य दिशा देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.मोबाईल,फोन आणि समाजमाध्यमांचा अतिरेक विद्यार्थ्यांच्या विकासावर परिणाम करत आहे. त्यामुळे शिक्षक व पालकांनी मिळून विद्यार्थ्यांना मोबाईल व समाज माध्यमांपासून दूर ठेवणे ही काळाची गरज असल्याचे मत रोटरी क्लबचे सहाय्यक प्रांतपाल डॉ.कैलास करंडे यांनी मांडले.

सांगोला येथील रोटरी क्लबच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रशिल्पकार पुरस्कारांचा वितरण समारंभ हा सांगोला अर्बन बँकेच्या महात्मा फुले सभागृहात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच पार पडला.सांगोला रोटरी क्लब आयोजित या कार्यक्रमास शिक्षक,शिक्षणप्रेमी नागरिक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.  सदर कार्यक्रमास सहाय्यक प्रांतपाल डॉ.कैलास करंडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे अध्यक्ष श्रीपती आदलिंगे,सचिव विजय म्हेत्रे, प्रकल्प मार्गदर्शक गुलाबराव बाबर,डॉ.प्रभाकर माळी हे उपस्थित होते.

याच कार्यक्रमात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लबच्या महिला सदस्यांचा विशेष गौरव करण्यात आला.रोटरी क्लबचे माजी सचिव प्रवीण मोहिते दरवर्षी महिला दिनानिमित्त हा उपक्रम राबवितात.यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,रोटरी क्लबमध्ये महिला सदस्यांचे योगदान अत्यंत कौतुकास्पद आहे.महिला संसार सांभाळून या जागतिक संस्थेमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर राहतात,ही अभिमानाची बाब आहे,असे सांगून ते पुढे म्हणाले की,रोटरी क्लबचे अध्यक्ष व सचिव यांना वर्षभर विविध उपक्रमांमुळे कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. अशावेळी,त्यांच्या पत्नींचा भक्कम पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यांच्या सहकार्याशिवाय हे कार्य शक्यच नाही.यावेळी मी प्रवीण मोहिते,माझ्या नेहमी पाठीशी असलेली माझी सपोर्ट सिस्टिम गीतांजली मोहिते या उभयतांतर्फे या सर्व महिला सदस्यांचा सन्मान करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो,असे सांगितले.

पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी आपल्या मनोगतात कृतज्ञता व्यक्त करत हा सन्मान अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचे सांगितले.सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात रोटरी क्लबचे अध्यक्ष श्रीपती आदलिंगे यांनी सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि.मधुकर कांबळे व दीपक चौथे यांनी केले.तर,आभार सचिव विजय म्हेत्रे यांनी मानले.
                    ==========================

राष्ट्रशिल्पकार पुरस्काराचे मानकरी :

श्री.भागवत भाटेकर,श्री.बापूसो भंडगे, श्री.बाबू पांढरे,सौ.स्मिता शिंदे-गायकवाड, श्री.ज्ञानेश्वर इंगोले,सौ.भाग्यश्री कुलकर्णी आणि श्री.प्रविण आदलिंगे यांना शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन राष्ट्रशिल्पकार पुरस्काराने गौरविण्यात आले.
==========================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button