नवी दिल्ली :
न्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे आता भारत देशाचे पुढील सरन्यायाधीश होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत यांनी केंद्र सरकारकडे त्यांच्या नांवाची शिफारस केली असून निवृत्त होणारे सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नांवाची शिफारस करतात. त्यानुसार, न्या.लळीत यांनी न्या.चंद्रचूड यांच्या नांवाची शिफारस केली आहे. त्यामुळे,न्या.धनंजय चंद्रचूड हे आता सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश बनणार असून न्या.चंद्रचूड यांच्या रुपाने सर्वोच्च न्यायालयात पुन्हा महाराष्ट्राला बहुमान मिळाला आहे.
विद्यमान सरन्यायाधीश न्या.लळीत यांचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर २०२२ रोजी संपणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना देशाच्या पुढील सरन्यायाधीशांच्या नांवाची शिफारस करण्याविषयी विचारणा केली होती. नियमांनुसार, सेवानिवृत्तीच्या एक महिना आधी भावी सरन्यायाधीशांच्या नांवाची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात येते. विद्यमान सरन्यायाधीश लळीत यांच्यानंतर धनंजय चंद्रचूड हे सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत. त्यामुळे लळीत यांनी चंद्रचूड यांची केंद्राकडे शिफारस केली आहे. लळीत यांच्यानंतर देशाला पुन्हा एकदा महाराष्ट्रातीलच सरन्यायाधीश लाभणार आहेत. न्या.चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड हे देखील तब्बल ७ वर्षे ४ महिने इतक्या प्रदीर्घ काळासाठी सरन्यायाधीशपदी कार्यरत होते.
न्या.धनंजय चंद्रचूड यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयातही न्यायाधीश म्हणून काम केले असून त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम केले आहे. न्या.उदय लळीत यांनी २६ ऑगस्ट २०२२ रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली होती. त्यांचा कार्यकाळ केवळ ७४ दिवसांचा असून ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर पुढील सरन्यायाधीशांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ पासून १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत दोन वर्षांचा असणार आहे. ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
More Stories
घरपट्टीत कसलीही दरवाढ नाही,ही तर वाढीव बांधकामामुळे करवाढ – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने
दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा
स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिन व जयंती दिनानिमित्त सांगोल्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन