सांगोला :
सांगोला तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या ६ ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या आबा-बापू आघाडीने ६ पैकी तब्बल ४ गांवात सरपंचपद तर,३२ ग्रामपंचायत सदस्य जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले असून तुलनेने अनेक वर्षे वर्चस्व असणाऱ्या शेकापला सरपंचपदाच्या फक्त २ जागांवर तर, ग्रा.पं.सदस्यांच्या २५ जागांवरच समाधान मानावे लागले.आबा-बापू आघाडी कडून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या नूतन सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा राष्ट्रवादी भवन, सांगोला व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी सत्कार करुन सर्वांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सांगोला तालुक्यातील शिवणे आणि बलवडी या दोन ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. आबा-बापू आघाडीने या दोन्ही गांवात प्रचंड मताधिक्य घेत शेकापची सत्ता उलथवून लावली. शिवणे गावच्या सरपंच पदी आबा-बापू आघाडीचे दादासाहेब घाडगे यांची तर, बलवडी गांवच्या सरपंचपदी शिंदे-आबा-बापू आघाडीचे ज्ञानेश्वर राऊत यांची प्रचंड मताधिक्याने निवड झाली. दरम्यान,निवडणूक जाहीर झाल्यावरच पाचेगाव व चिणके या दोन्ही गांवातील सरपंचपदाची निवडणूक आबा-बापू आघाडीने बिनविरोध जिंकली होती. चिणके गांवच्या सरपंचपदी आघाडीचे नाथा खंडागळे यांची तर,पाचेगांव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आघाडीच्या संगीता संजय भोसले यांची बिनविरोध निवड झाली होती.
बलवडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आबा-बापू आघाडीने ११ पैकी तब्बल १० जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळवला तर,शेकापला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. चिणके येथेही बिनविरोध सरपंच पदासह ११ पैकी आबा-बापू आघाडीने ९ जागांवर आपले वर्चस्व कायम राखले तर,शेकापला केवळ २ जागा जिंकता आल्या तसेच पाचेगांव येथील सरपंच पदासह सर्व सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली होती. यापैकी आबा-बापू आघाडीने ९ पैकी ६ जागांवर बिनविरोध यश मिळवले तर, शेकापच्या वाट्याला केवळ ३ जागा आल्या. तर,संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिवणे ग्रामपंचायत निवडणुकीत शेकापची सत्ता उलथवून लावत आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार दादासाहेब घाडगे यांनी मोठा विजय मिळवला आणि आबा-बापू आघाडीने ११ पैकी ७ जागा जिंकून गांवात स्पष्ट बहुमतासह सत्ता प्रस्थापित केली. एकेकाळी सत्ताधारी असलेल्या शेकापला इथे फक्त ४ जागा राखता आल्या. अनकढाळ ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र शेकापने सरपंचपदासह सर्व ९ जागा जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले तर,चिंचोली ग्रामपंचायत निवडणुकीत शेकापने सरपंचपदासह शेकापमधील दोन्ही गट मिळून ६ जागा जिंकू शकले. इथे मात्र,अनपेक्षितपणे तरुणांनी उभा केलेल्या आघाडीने तब्बल ५ जागांवर विजय मिळवला.
एकंदरीत, सांगोला तालुक्यात पार पडलेल्या ६ ग्रामपंचायत निवडणुकीत आबा-बापू आघाडीने जोरदार मुसंडी मारुन ४ सरपंचपदासह तब्बल ३२ ग्रामपंचायत सदस्यांच्या जागेवर मोठ्या फरकाने विजय मिळवून प्रस्थापित शेकापला चांगलीच धोबीपछाड दिली आहे. या विजयामुळे आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दिपकआबा साळुंखे- पाटील यांच्या समर्थकांनी सांगोला येथे तसेच आपापल्या गांवात विजयी गुलाल उधळून आणि फटाक्यांची आतिषबाजी करुन जल्लोष साजरा केला. ———————————————————————–
आबा–बापूकडून विजयी शिलेदारांचे कौतुक आणि शुभेच्छा :
सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाची अनेक वर्षांची मक्तेदारी मोडून आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या आबा-बापू आघाडीने सांगोला तालुक्यातील ६ पैकी ४ ग्राम पंचायतीवर तसेच ३२ हून अधिक सदस्यांच्या जागांवर निर्विवाद यश प्राप्त केल्यानंतर आघाडीचे नेते आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दिपकआबा साळुंखे- पाटील यांनी आघाडीतून विजयी झालेल्या सर्व बहाद्दर शिलेदारांचे विशेष कौतुक करुन त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक