….आता नेतृत्व बदलण्याची वेळ आली असून मी स्वतः मैदानात उतरणार – धर्मराज काडादी
सोलापूर :
सोलापूरातील कांही ठराविक लोक सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी पडावी,कारखाना बंद पडावा, यासाठी व्यक्तिद्वेषपणे काम करत आहेत. सिध्देश्वर कारखाना तसेच देवस्थानचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे.कारखाना,कॉलेज,शिक्षण संस्था,मुलींचे इंजिनिअरिंग कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल सुरळीत चालू आहे, हेच त्यांना बघवत नसल्याची टीका भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे नांव न घेता, त्यांचेवर केली आणि चिमणीचे कारण सांगून इतर प्रकल्पाला विरोध करणार्या व सूडबुध्दीने वागणार्या या नेतृत्वाला आता बदलण्याची वेळ आली असून वेळ पडली तर मी स्वतः मैदानात उतरणार,असा जणू इशाराच धर्मराज काडादी यांनी होम मैदानावरील विराट मोर्चापुढे दिला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रस्तावित बोरामणी विमानतळ सुरु करण्यासाठी आणि श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी वाचवण्यासाठी कारखान्याचे संचालक तथा मार्गदर्शक धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली कुमठे (सोलापूर) येथील सिध्देश्वर साखर कारखान्यापासून सोलापूर शहरातील होम मैदानावर सोमवारी भव्य असा मोर्चा काढण्यात आला असता, या मोर्चापुढील सभेत धर्मराज काडादी हे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या चिमणीसाठी शासन दरबारी व कोर्ट कचेरीत भांडत आलो त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च झाले असून चिमणीची जाणीवपूर्वक एनओसी मागितली जाते, चिमणी कोणत्याही परिस्थितीत आडवी येत नाही, तरीही विकास मंचची मंडळी जाणीवपूर्वक त्रास देत आहेत, नेमका विकास काय ? हेच त्यांना माहिती नाही तसेच मी त्यांना हत्यार दाखवायला गेलो नव्हतो,आंदोलन करा पण, कायदेशीर लढा,असे सांगीतले.मला वाटले तर मी कधीही मारु शकलो असतो,पण माझा तो उद्देशच नव्हता. सिद्धेश्वर देवस्थानमध्ये भांडणे लावायची, सत्तेचा गैरवापर करुन इंजिनिअरिंग कॉलेजला दंड भरायला लावायचा, हे जाणीवपूर्वक केले जाते. विकास मंचच्या मंडळीत दम नाही, यांच्या मागे दुसराच आहे.त्यामुळे आता या नेतृत्वाला समाजाने बदलण्याची वेळ आली असून वेळ आली तर मी स्वतः मैदानात उतरणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला.
यावेळी बोलताना माजी महापौर महेश कोठे म्हणाले,काँग्रेस सरकार असताना,माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी एनटीपीसीची मंजूरी आणली, त्याची ३०० मीटरची चिमणी झाली.नंतर सरकार बदलले आणि ९० मीटरच्या चिमणीलाही मंजुरी मिळत नाही, खरे राजकारण तिथून सुरु झाले असून सन २००० सालचा सर्व्हे रिपोर्ट असा आहे की, ट्रॅक नंबर ३३ चा अडथळा येतो, ट्रॅक नंबर १५ वर कोणताही अडथळा नाही, विमाने येतात आणि जातात ट्रॅक ३३ सुरु करायचा असेलतर,केवळ चिमणी पाडून चालणार नाही तर, सर्व हाय टेन्शन इलेक्ट्रिक वायर काढले पाहिजेत,असे सांगून धर्मराज काडादी यांचेकडे पहात ‘आता,तुम्हीच मैदानात उतरा’,असे आवाहन महेश कोठे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे,माजी आमदार दिलीप माने,दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे,माकपचे माजी आमदार आडम मास्तर,माजी आमदार शिवशरण पाटील,माजी सभापती इंदुमती अलगोंडा-पाटील, माजी महापौर महेश कोठे,काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे,कारखान्याचे अध्यक्ष आण्णाराज काडादी, उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, स्वामी समर्थ सूतमिलचे चेअरमन राजशेखर शिवदारे,काँग्रेस नेते विजयकुमार हत्तुरे,जि.प.चे माजी सदस्य आनंद तानवडे,शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर,माजी सभापती आप्पाराव कोरे,प्रहारचे जमीर शेख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील,गुरुसिध्द म्हेत्रे,बाजार समितीचे संचालक अमर पाटील, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, माजी नगरसेवक विनोद भोसले, आप्पासाहेब पाटील,माजी आमदार विश्वनाथ चाकोते, बोरामणी विमानतळ संघर्ष समितीचे राजू चव्हाण,माजी सभापती जालिंदर लांडे,शेतकरी संघटनेचे शिवानंद पाटील, माजी विरोधी पक्षनेते सुरेश पाटील,भाजप नेते अशोक निंबर्गी, काँग्रेसचे विजय शाबादी,राष्ट्रवादीचे आनंद मुस्तारे, भीमाशंकर बिराजदार, बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे,ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील, माजी सभापती अशोक देवकते,जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख,काँग्रेसचे विलास लांडे तसेच सर्वपक्षीय नेते व शेतकरी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————————————————