मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहीजेत – बावनकुळेंच्या मनकी बात

 

नागपूर :

“मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत”असे वादातीत वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये सुरु होणार्‍या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर केल्यामुळे राजकारण तापण्याची चिन्हे दिसून येत असून बावनकुळे यांनी ‘मन की बात’ बोलून दाखविल्याने त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे आणि महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवातही केलेली आहे.

तेली समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,जो जो समाज देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेला,त्या प्रत्येक समाजावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला आहे. यामुळे मी भाजप प्रदेशाध्यक्ष असताना, देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, ही आपली ‘मन की बात’ बावनकुळे यांनी “फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत” ही उपस्थितांकडून वदवूनही घेतली आणि त्यांना मुख्यमंत्री पदावर बसवणे, ही आपली सर्वांचीच जबाबदारी असून देवेंद्र फडणवीसांमागे सर्वांनी उभे राहिले पाहिजे”,अशी अपेक्षाही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांना फक्त मुख्यमंत्री पदावर बसवण्याकरिताच मुख्यमंत्री करायचे,असे नाहीतर, महाराष्ट्राचे भवितव्य हे फक्त देवेंद्र फडणवीसच घडवू शकतात,हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे”, असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.

संत जगनाडे महाराज यांच्या संदर्भात आयोजित तेली समाजाच्या एका कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केले असून ओबीसी समाजातील अनेक नागरिक आणि नेते मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित होते. ओबीसी समाजाने फडणवीस यांच्या पाठीमागे उभे राहायला पाहिजे.फडणवीस हे जाती पातीच्या वर गेलेले नेते आहेत. ते सर्वच समाजासाठी काम करतात. यामुळे त्यांच्या पाठिशी उभे राहणे ही सर्व समाजांची जबाबदारी आहे. तसेच २०१४ ते २०१९ चा जो काळ होता, तो काळ (फडणवीस सरकारचा) पुन्हा महाराष्ट्रात आला पाहिजे, असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले असून “फडणवीस काय झाले पाहिजेत ?” असे बावनकुळे यांनी जाहीर सभेत उपस्थित नागरिकांना विचारले असता, “फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत”, असा प्रतिसाद उपस्थितांनीही यावेळी दिला. बावनकुळे यांनी स्वत: हे वक्तव्य केले नसले तरी,त्यांनी उपस्थितांकडून मुद्दामहून तसे वदवून घेतले, त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य सूचक मानले जात आहे.                                          “सध्या महाराष्ट्रात शिंदे गट व भाजपचे सरकार असून पुढची विधानसभा निवडणूक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवली जाईल”,असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत असले तरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले हे वक्तव्य परस्परविरोधी असल्याचे दिसून येते. यामुळे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यावरुन राजकारण तापण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

*  भाजप हा मुख्यमंत्री शिंदे आणि शिंदे गटाचा राजकीय गेम करणार :

कांही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनीही “देवेंद्र फडणवीस हेच आमचे खरे मुख्यमंत्री आहेत”, असे वक्तव्य केले होते. आता बावनकुळे यांनीही त्याचपध्दतीचे वक्तव्य केलेले आहे. एवढचं नाही तर, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही “महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस”, असे स्वतःहूनच एकदा सांगितले होते.याचा अर्थ स्पष्टच आहे की, एकनाथ शिंदे आणि शिंदे गट हा भाजपला पूर्णपणे शरण गेला असून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावे, असे भाजपच्या मनात आहे आणि त्यामुळेच भाजप एकनाथ शिंदे यांना कवडीचीही किंमत देत नाही,असे चित्र आहे. बावनकुळे यांच्या वक्तव्याचा अर्थही हाच आहे. याचा विचार शिंदे गटाने आणि महाराष्ट्रानेही केला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे हे वक्तव्य म्हणजे, एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व त्यांना मान्य नाही,याचीच प्रचिती येते.त्यामुळे लवकरच शिंदे आणि शिंदे गटाचा राजकीय गेम करुन सत्तारुढ होण्यासाठी भाजपचे नेते आसुसलेले आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे आ.अमोल मिटकरी यांनी केली आहे.
—————————————————————————