राजकीय

सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी दिले काँग्रेसला समर्थन

सांगली/प्रतिनिधी :

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलेल्या सांगली लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी अखेर स्व.वसंतदादा घराण्याची शान राखत व भाजपाचे मावळते खासदार संजय काका पाटील यांच्या ‘हॅट्ट्रीक’ ला ब्रेक लावत खासदारकी अक्षरश: खेचून आणली आणि विजयानंतर, काँग्रेसलाच पाठींबा देणार असल्याचा दिलेला शब्द पाळत त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची दिल्लीत भेट घेवून काँग्रेसला समर्थन असल्याचे पत्रही दिले.यावेळी त्यांचेसोबत माजी मंत्री तथा आमदार डाॅ.विश्वजीत कदम हे ही उपस्थित होते.

यावेळी लोकसभा निवडणुकी दरम्यान,महाराष्ट्रात अनेक राजकिय घडामोडी घडत गेल्या.महाविकास आघाडीच्या जागावाटपात फेरबदल करण्यात येवून उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला येणारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसच्या शाहूराजेंना सोडण्यात आल्यामुळे,काँग्रेसच्या वाट्याला येणार्‍या सांगलीच्या जागेवर उध्दव ठाकरे (उबाठा) गटाने दावा केला आणि तिथे पैलवान चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली.परंतु,सांगलीची खासदारकी लढविण्यासाठी फार पूर्वीपासूनच तयारीला लागलेले माजी मुख्यमंत्री स्व.वसंतदादांचे नातू (स्व.खासदार प्रकाशबापूंचे चिरंजीव) विशाल पाटील यांनी उमेदवारीसाठी आम. विश्वजीत कदम यांच्या माध्यमातून काँग्रेसकडे हट्ट धरुनही आघाडीच्या राजकारणामुळे उमेदवारी न मिळाल्याने शेवटी बंडखोरी करत विशाल पाटलांनी ही निवडणूक लढवली आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सहकार्याने भाजपचे मावळते खासदार संजयकाका पाटील व महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांना पराभवाची धूळ चारत तब्बल १ लाखांहून अधिक मताधिक्क्याने ही निवडणूक जिंकली.
                          ——————————————————

काँग्रेसच्या खासदारांचे शतक पूर्ण :

महाराष्ट्रात अहंकारी राजकारणाला जनतेने पराभूत केले. सामाजिक न्याय,समता व स्वातंत्र्यांसाठी लढणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या आपल्या प्रेरणादायी दिग्गजांना ही योग्य श्रद्धांजली आहे.सांगलीतील खासदार विशाल पाटील हे सध्यातरी, तांत्रिकदृष्ट्या अपक्ष उमेदवार असून त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.विशाल पाटील यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे देशात आता काँग्रेसच्या खासदारांचे शतक पूर्ण झाले आहे.
          – मल्लिकार्जुन खरगे (अध्यक्ष – राष्ट्रीय काँग्रेस)
                      ———————————————————

खा.संजय पाटलांची हुकली हॅट्ट्रीक :

सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी २०१४ व २०१९ असे दोन वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले.यंदाच्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून येवून ते हॅट्ट्रीक करणार होते.पण पक्षातंर्गत विरोध व विशाल पाटील यांच्या दमदार उमेदवारीमुळे त्यांची हॅट्ट्रीक हुकली.
                       ———————————————————

सोनिया व राहुल गांधींची घेतली भेट :

सांगलीचे नवनिर्वाचित अपक्ष खासदार विशाल पाटील व काँग्रेसचे नेते आमदार डाॅ.विश्वजीत कदम यांनी दिल्लीतील १० जनपथ येथे काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली.तसेच त्यांनी काँग्रेस नेते व लोकसभेचे नुतन विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली.
———————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button