राजकीय

मला उपमुख्यमंत्रीपदावरुन मोकळं करा – देवेंद्र फडणवीसांचे पक्षनेतृत्वाला साकडे

 

मुंबई/विशेष प्रतिनिधी :

लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला विशेषत: भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र राज्यात सपशेल अपयश आल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.या पार्श्वभूमीवर, भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,
             “विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर,पक्ष संघटनेचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी सरकारमधील जबाबदारीतून मला मुक्त करावं.पक्षाच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारत असून मला उपमुख्यमंत्री पदावरुन मोकळं करावं”,
      असे साकडे मी पक्षनेतृत्वाकडे घालणार असल्याचे पत्रकार परिषद घेवून त्यांनी जाहीर केले आहे.या पत्रकार परिषदेस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,नाम.चंद्रकांतदादा पाटील,माजी मुख्यमंत्री व भाजपाचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण,मुंबईचे अध्यक्ष आ.आशिष शेलार,महिला नेत्या चित्रा वाघ व इतर मान्यवर उपस्थित होते.

                         मंगळवारी जाहीर झालेला लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता,महाराष्ट्र राज्यातील एकूण ४८ जागांपैकी फक्त ९ जागांवरच भाजपाला विजय प्राप्त करता आला असून या निवडणुकीत भाजपाचे अनेक दिग्गज उमेदवार पराभूत झाले आहेत.भाजपाच्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्विकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की,
                               “महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही.किंबहुना आमच्या अपेक्षापेक्षा खूपच कमी जागा आम्हाला मिळाल्या.आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं असून सरकारमधून मला मोकळं करावं”, अशी विनंती मी नेतृत्वाकडे करणार आहे,असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की,भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केले आहे. मुंबईच्या अध्यक्षांनीही स्वत: लक्ष घातले तरीही जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी असून सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. मला सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती मी करणार आहे.बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे,असे सांगून राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही, अशी कबुलीही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
                               ————————————————

नरेटिव्ह थांबवता आला नाही :

महाराष्ट्रात आमची लढाई महाविकास आघाडीसोबत होतीच, त्याचसोबत नरेटिव्हसोबतही करावी लागली. त्यामध्ये संविधान बदलणार असा नरेटिव्ह तयार करण्यात आला.हा नरेटिव्ह आम्हाला थांबवता आला नाही,त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही,त्याचाच आम्हाला मोठा फटका बसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
                               ————————————————

भाजपला जनतेने नाकारले नाही :

जनतेने दिलेला जनादेश माणून आम्ही पुढील तयारी करण्याचा निर्णय घेतला असून ज्यांना जास्त जागा मिळाल्या,त्यांचं अभिनंदन करतो.भाजपला राज्यात लोकांनी नाकारले,अशी परिस्थिती नाही. सम-समान मते मिळाली आहेत. आज आम्ही बसून निवडणुकीचा आढावा घेतला असून कोणते मुद्दे होते,याचा आम्ही विचार केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

               कांही ठिकाणी अँटीइन्कबन्सी दिसली.कांही ठिकाणी कांद्याचा प्रश्न होता.सोयाबीन आणि कापूस याचा देखील प्रश्न होता.सरकाने आरक्षण दिल्यानंतर एक नरेटिव्ह तयार केला गेला,त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही,असेही फडणवीस म्हणाले.
                               ————————————————

एनडीएच्या यशावर फडणवीसांचे मत :

देशभरातील भाजपच्या व एनडीएच्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो.पंडित नेहरु यांच्यानंतर प्रथमच पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा आशिर्वाद जनतेने मोदींना दिला असून पुन्हा एकदा एनडीएचं सरकार देशात येणार. १९६२ नंतर पहिल्यांदाच असे सरकार होत आहे. ओडिशामध्येही भाजपचे प्रथमच सरकार होत असून आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबूंच्या नेतृत्वास पसंती मिळाली आहे. अरुणाचल मध्ये पुन्हा भाजपचे सरकार आले.लोकसभेसोबत एनडीए व भाजपला मोठा कौल दिल्याबद्दल जनतेचे आभार.
                                                      – देवेंद्र फडणवीस
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button