सांगोल्यावर लाल बावटा फडकावूनच आबासाहेबांना श्रध्दांजली वाहणार – डॉ.बाबासाहेब देशमुख

शेकापच्या डॉ.बाबासाहेबांनी भरला उमेदवारी अर्ज

सांगोला :

येणारी निवडणूक ही धनशक्ती विरुध्द जनशक्ती अशी असणार असून सांगोल्याची जनता ही विचाराला महत्व देणारी आहे.स्व.आबासाहेबांनी राजकारण व समाजकारण करताना प्रशासकीय अधिकार्‍यांना त्रास होणार नाही,याची नेहमीच काळजी घेतली म्हणून कार्यकर्त्यांचा रेटा असतानाही मी रॅली न काढता, शांततेत अर्ज भरला.सांगोला तालुका भष्टाचार मुक्त करण्यासाठी अर्ज दाखल केला असून सांगोला विधानसभा मतदार संघावर लाल बावटा फडकावूनच आबासाहेबांना श्रध्दांजली वाहणार असल्याचे मत शेकापचे अधिकृत उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.

डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी शेकापकडून सर्व जाती धर्मातील नागरिकांसमवेत व शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी युवा नेते डॉ.अनिकेत देशमुख,डॉ. निकीताताई देशमुख,शोभाताई पाटील,चिटणीस दादाशेठ बाबर,प्रा.विठठलराव शिंदे सर,सूतगिरणीचे चेअरमन डॉ.प्रभाकर माळी,माजी नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर,उद्योगपती बाळासाहेब एरंडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन इंजि.रमेश जाधव,मार्केट कमिटीचे चेअरमन समाधान पाटील,माजी नगरसेवक पप्पू उर्फ प्रशांत धनवजीर,अ‍ॅड.नितीन गव्हाणे, नंदकुमार शिंदे,उद्योगपती अरुण पाटील,जेष्ठ नेते प्रभाकर चांदणे, संजय इंगोले,अ‍ॅड.विशालदिप बाबर इ.मान्यवर उपस्थित होते.

     शेकापच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना डॉ.बाबासाहेब देशमुख पुढे म्हणाले की,स्व. आबासाहेबांनी तालुक्यामध्ये नाही रे घटकांचे प्रतिनिधीत्व केले,तोच विचार टिकविण्यासाठी माझा प्रयत्न असणार असून मागच्या ५ वर्षामधील परिस्थितीची प्रत्येकाला जाणीव आहे,त्यामुळे जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.शेतीला पाणी, पिकाला व दुधाला भाव मिळाला पाहिजे आणि चांगले शिक्षण मिळाले पाहीजे,हा विचार पुढे ठेवून तालुक्याचे काम करणार आहे.स्व.आबासाहेबांनी पुरोगामी विचार तालुक्यात टिकवला.तालुक्यातील जनता ही निष्ठावंत व स्वाभिमानी असल्यामुळे सांगोल्यात लाल झेंडा फडकेल,असा विश्वासही डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी शेवटी व्यक्त केला.
             ——————————————————————

शेकाप ताकदीने निवडणूक लढविणार :

सांगोला तालुक्यात मोठया प्रमाणात सुरु असणारे काळेधंदे थांबवायचे असतील व स्व. आबासाहेबांचे पुरोगामी विचार टिकवायचे असतील तर,आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा.शेतकरी कामगार पक्षामुळेच सांगोला तालुक्याला पुढे चांगली दिशा मिळेल.कार्यकर्त्यांच्या बळावर लाल बावटा फडकावून आबासाहेबांना श्रध्दांजली वाहू. स्व.आबासाहेबांनी सांगोला तालुक्यासाठी ६० वर्षे जे काम केले आहे,ते पुढे टिकविण्यासाठी शेकाप ताकदीने निवडणूक लढविणार आहे.
         – डॉ.अनिकेत देशमुख
——————————————

अत्यंत साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल :

डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख यांचे आशिर्वाद घेतले.त्यानंतर, सूतगिरणी येथील स्व.  आबासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाऊन दर्शन घेतल्यानंतर डॉ.अनिकेत देशमुख यांच्यासमवेत मोटारसायकलवर प्रवास करत सांगोल्याचे ग्रामदैवत अंबिकादेवीचे दर्शन घेवून अत्यंत साधेपणाने तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.