अभूतपूर्व शक्तीप्रदर्शन,विक्रमी गर्दी,प्रचंड जल्लोष व ढोल ताशांच्या गजरात दीपकआबांचा उमेदवारी अर्ज दाखल

उध्दव ठाकरे यांच्या मशाल चिन्हासह महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल

सांगोला :

                         संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी सांगोला तालुक्याच्या राजकीय इतिहासातील ऐतिहासिक,अभूतपूर्व व रेकॉर्डब्रेक शक्तीप्रदर्शन करत सोमवारी उध्दव ठाकरे यांच्या मशाल चिन्हासह महाविकास आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व काँग्रेस यांच्यासह मित्र पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीकडून सोमवारी २८ रोजी दीपकआबांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी बहीरप्पा माळी यांच्याकडे दाखल केला.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,घेरडी गावचे माजी सरपंच व धनगर समाजाचे युवा नेते बिरा पुकळे आणि शिवसेना महिला आघाडीच्या सुरेखा सलगर आदी मान्यवर उपस्थित होते.

                दीपकआबा साळुंखे-पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुमारे ३० ते ३५ हजार दीपकआबा प्रेमी शिवसैनिकांनी सांगोला शहरात गर्दी केली होती.संपूर्ण विधानसभा मतदारसंघातून वाहनांचे लोंढेच्या लोंढे शहरात दाखल झाल्याने संपूर्ण रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाल्याचे चित्र सोमवारी दिवसभर पाहायला मिळाले.प्रचंड जल्लोष,ढोल ताशांचा कडकडाट आणि उत्साहात शहरातील महात्मा फुले चौक येथून माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली सुरु झाली.विशेष म्हणजे,रॅलीतील सर्वात पुढे असणारे लोक सांगोला तहसील कार्यालयात पोहोचले तरीही, रॅलीमध्ये सहभागी असणारे लोक अजूनही महात्मा फुले चौकातच होते.

         दीपकआबांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जयभवानी चौक येथे या रॅलीचे जाहीर सभेत रुपांतर झाले.यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव,संभाजीराजे शिंदे,माजी नगराध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके,माजी नगरसेवक शिवाजीराव बनकर, अभिषेक कांबळे,संभाजी हरिहर,तुषार इंगळे,अक्षय चोरमुले,अजित देवकते,संतोष पाटील,नवनाथ मोरे, अनिल नवत्रे,सखुबाई वाघमारे आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासासाठी २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील या वारकरी सांप्रदायाचा आणि निस्सीम निस्वार्थी सेवेचा वारसा लाभलेल्या उमेदवाराला विजयी करुन राज्यातील सत्ताधाऱ्यांना हद्दपार करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.
            ——————————————————————

शेवटच्या श्वासापर्यंत विश्वासाला तडा जाऊ देणार नाही :

यंदाची विधानसभा निवडणूक ही सांगोला विधानसभा मतदार संघातील जनतेनेच हातात घेतली असून महाविकास आघाडीकडून मला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी दिली आहे. मी हाती मशाल घेतल्यापासून माझ्याकडे शिवसेना परिवारात दररोज नवीन लोंढे दाखल होत आहेत.फक्त एका हाकेवर ८ ते १० हजार महिला व हजारोंच्या संख्येने माझ्यावर आणि शिवसेनेवर तसेच महाविकास आघाडीवर प्रेम करणाऱ्या ३० ते ३५ हजार कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. आजवर केलेल्या प्रामाणिक कामाची हीच खरी पोहोच पावती म्हणावी लागेल.सांगोलकरांचे प्रेम आणि विश्वास पाहून खरोखर मी भारावून गेलो आहे.माझ्याकडे वारकरी संप्रदायाचा वारसा व सेवेचा वसा आहे. सांगोलकरांच्या प्रेमाला आणि विश्वासाला शेवटच्या श्वासापर्यंत तडा जाऊ देणार नाही.
– दीपकआबा साळुंखे-पाटील (उमेदवार,महाविकास आघाडी)

—————————————

काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचाही दीपकआबांना बिनशर्त पाठिंबा :

सांगोला विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाच्या महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांनी नुकतीच बैठक घेऊन सर्वानुमते महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता.काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनेही तालुकाध्यक्ष डॉ.धनंजय पवार यांनीही जाहीर सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा दीपकआबांना पाठिंबा जाहीर केला. आबांना पाठिंबा देण्याचा निर्णय आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना विश्वासात घेऊनच घेतला असल्याचेही डॉ.धनंजय पवार यांनी जाहीर केले.