अखेर,सांगोल्याच्या देशमुख बंधूंमध्ये दिलजमाई

बुधवारी शेकापच्या मेळाव्यात मनोमिलनाची व उमेदवाराचीही होणार घोषणा

सांगोला :

जेष्ठ नेते स्व.गणपतराव देशमुख यांनी शेतकरी,कष्टकरी व कामगारांच्या उज्वल भविष्यासाठी अहोरात्र झटून सांगोला तालुक्यात उभी केलेली कार्यकर्त्यांची फळी आता त्यांच्या पश्चात दोन नातवांमध्ये चाललेल्या राजकिय वारसाच्या दंद्वयुध्दात विस्कटते की काय ? अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अखेर देशमुख बंधूंमध्ये दिलजमाई झाली असून डाॅ.बाबासाहेब व डाॅ.अनिकेत या दोन भावांमधील मनोमिलनाची व शेकापच्या उमेदवाराचीही घोषणा शेकापचे जेष्ठ नेते व माजी आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत उद्या बुधवारी दुपारी होणार्‍या शेकापच्या भव्य मेळाव्यात करण्यात येईल,अशी माहिती शेकापच्या पदाधिकार्‍यांनी दिली.

शेकापचा बालेकिल्ला असलेल्या सांगोला विधानसभा मतदार संघातून सुमारे १३ वेळा निवडणूक लढवून तब्बल ११ वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे शेकापचे जेष्ठ नेते स्व.गणपतराव देशमुख तथा आबासाहेब यांनी २०१९ ची निवडणूक स्वत: न लढता आपले नातू डाॅ.अनिकेत चंद्रकांत देशमुख यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांचा अल्पमताने पराभव झाला होता. दरम्यानच्या काळात,स्व.आबासाहेबांच्या निधनामुळे व डाॅ.अनिकेत हे उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाहेरगांवी असल्याने सांगोल्यात शेकापच्या नेतृत्वात एकप्रकारची पोकळी निर्माण झाली होती.

परंतु,स्व.आबासाहेबांचे दुसरे नातू डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी शेकापच्या कार्यकर्त्यांशी सतत संपर्क ठेवून ती उणीव व पोकळी भरुन काढत शेकापचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.उर्वरित शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, डाॅ.अनिकेत हे ही सांगोला तालुक्याच्या राजकिय व सामाजिक कार्यक्रमात अधुनमधून सक्रिय होवू लागल्याने शेकापमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येवू लागले. आता,तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत दोन बंधूंपैकी कुणाला संधी द्यायची ? हा फार मोठा संभ्रम व द्विधावस्था शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती.

            अखेर,ऐन निवडणुकीच्या धामधुमीत देशमुख बंधूंमध्ये दिलजमाई झाली असून डाॅ.बाबासाहेब व डाॅ.अनिकेत या दोन भावांमधील मनोमिलनाची व शेकापच्या उमेदवाराचीही घोषणा शेकापचे जेष्ठ नेते व माजी आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत उद्या बुधवारी दुपारी होणार्‍या शेकापच्या भव्य मेळाव्यात करण्यात येणार असल्याने सांगोला तालुक्यातील शेकापच्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.
—————————————————————

डाॅ.बाबासाहेब देशमुख हेच शेकापचे उमेदवार :

सांगोला विधानसभा मतदार संघात यंदा शेकापचा उमेदवार कोण असणार ? डाॅ.बाबासाहेब की, डाॅ.अनिकेत ? हा प्रश्न संपूर्ण तालुक्यातील जनतेला सतावत होता.यावर आता,उद्याच्या शेकापच्या मेळाव्याआधीच तोडगा निघाला असून अखेर,डाॅ.बाबासाहेब देशमुख हेच शेकापच्या वतीने उमेदवारी लढवणार असल्याचे निश्चीत झाले आहे.