सांगोल्यात महाविकास आघाडीचा पाठींबा आता उध्दवसेनेला की,शेकापला ?
सांगोला :!
अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देवून सांगोल्यातून प्रसंगी,अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी शड्डू ठोकून तयारीला लागलेल्या माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे शिवसेनेची मशाल हाती घेत, काल शुक्रवारी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने सांगोल्यात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली असून महाविकास आघाडीचा पाठींबा आता उध्दवसेनेला की, शेकापला ? असा मोठा पेच महाविकास आघाडीतील पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांपुढे पडला असल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकापचीही धाकधुक दीपकआबांच्या शिवसेना प्रवेशाने वाढली आहे.
सांगोला विधानसभा मतदार संघात गेल्या २५-३० वर्षांपासून आमदारकीसाठी शेकापचे दिवंगत नेते स्व.गणपतराव देशमुख व विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्यातील दुरंगी लढत ही सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.यंदाची २०२४ ची विधानसभा निवडणुक मात्र,स्व.गणपतराव देशमुख यांच्या पश्चात होत असून शेकापचे युवा नेते डाॅ.बाबासाहेब किंवा डाॅ.अनिकेत या शेकापच्या संभाव्य उमेदवारांविरुध्द विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांचेसह आता कधी नाही ते,माजी आमदार दीपकआबाही मैदानात उडी घेत असल्याने ही तिरंगी लढत लक्षवेधी ठरणार आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर राज्यात शेकापची नेहमीच आघाडी राहिली असून महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना (उबाठा) या प्रमुख पक्षांसह शेकापही मविआमध्ये सहभागी आहे.त्यामुळे, सांगोला विधानसभा निवडणुकीतही मविआचा शेकापच्या उमेदवारालाच पाठींबा असणे साहजिक आहे.परंतु, यंदाच्या निवडणुकीत माजी आमदार दीपकआबांच्या एन्ट्रीमुळे आणि त्यांनी उध्दवसेनेत केलेल्या प्रवेशामुळे उध्दवसेनेनेही सांगोल्याची जागा लढवण्याचा चंग बांधला असल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दीपकआबांच्या एन्ट्रीमुळे महाविकास आघाडीचा पाठींबा आता उध्दवसेनेला की,शेकापला ? असा मोठा पेच महाविकास आघाडीतील पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांपुढे पडला असल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकापचीही धाकधुक वाढली आहे.
———————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक