राजकीय

काँग्रेसची “भारत जोडो यात्रा” देशाला नवी दिशा देणार – प्रा.पी.सी.झपके

 

सांगोला :

काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मिर अशी “भारत जोडो यात्रा” निघाली असून सध्या ती यात्रा महाराष्ट्र राज्यात आली आहे. या यात्रेला देशभरातून सर्व राजकीय पक्ष व संघटना यांचा मोठा पाठिंबा मिळत असून या यात्रेमुळे देशभरातील विविध जातीधर्मातील व उद्योगातील, नोकरदार आणि युवक वर्ग जागृत होत आहे.देशाच्या भल्यासाठी एक नवीन पर्याय मिळाला असल्याची भावना त्यांच्या मनात आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रा आगामी काळात देशाला नवी दिशा देईल,असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.पी.सी.झपके यांनी व्यक्त केला.

भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी व यात्रेत सहभागी होण्यासाठी येत्या १६ तारखेला अकोला येथे सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते आम.प्रणिती शिंदे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाणार असून त्यासंबंधी विचार विनीमय करण्यासाठी गुरुवारी सांगोला येथील आदर्श पतसंस्था येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.पी.सी.झपके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील, विलास पाटील, युवक तालुकाध्यक्ष अजित चव्हाण, अमोल यादव, काका नरुटे, फिरोज मणेरी, बाबा ऐवळे, सिध्देश्वर काळे, काशिनाथ ढोले, बाळासाहेब रणदिवे, मोहन भोसले, जगन्नाथ माने, अन्सार इनामदार,प्रशांत रायचुरे,अनिल बेहेरे, नरेंद्र होनराव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर बैठकीत बोलताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल भोरे म्हणाले की,सदर भारत जोडो यात्रेला पाठींबा देण्यासाठी सांगोला तालुक्यातून जवळपास पाचशे कार्यकर्ते जाणार असून १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सांगोला येथून वाहने निघणार असून सोलापूर येथे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वाहने एकत्रित येणार आहेत. तेथून पुढे अकोला येथे यात्रेत सहभागी होण्यासाठी एकत्रितपणे जाणार आहेत. सांगोला तालुक्यातील जवळपास पाचशे कार्यकर्ते जाणार असून त्यांच्या वाहनांची व नावांची यादी उद्यापर्यंत जिल्हा काँग्रेस कमिटीला देणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सुनिल भोरे यांनी दिली.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button