अखेर इंग्लंडनेच जिंकला टी ट्वेन्टी वर्ल्ड कप
मेलबोर्न :
टी ट्वेन्टी वर्ल्ड कपच्या फायनलला झालेल्या सामन्यात इंग्लंडने अखेर पाकिस्तानवर दमदार विजय मिळवत टी ट्वेन्टी वर्ल्ड कप जिंकला. पाकिस्तान व इंग्लंड यांच्यातील फायनलचा सामना चांगलाच रंगला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक व भेदक मारा केल्यामुळे पाकिस्तानच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सुरुवातीला पाकिस्ताननेही इंग्लंडला तीन धक्के दिले खरे, पण त्यानंतर इंग्लंडचा संघ सावरला. बेन स्टोक्स आणि हॅरी ब्रुक्स यांनी चांगली फलंदाजी केल्यामुळे सामना फिरला आणि पाकिस्तानवर मात करत इंग्लंडचा संघ क्रिकेटच्या जगतात वर्ल्ड चॅम्पियन ठरला.
रविवारी मेलबोर्नमध्ये पार पडलेल्या इंग्लंड व पाकिस्तान मधील फायनलमध्ये पाकिस्तानचे १३८ धावांचे आव्हान हे मोठे दिसत नव्हते, पण, तरीही त्यांच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. पहिल्याच षटकात त्यांनी इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर त्यांनी फिल सॉल्ट आणि कर्णधार जोस बटलर यांनाही बाद केले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था ३ बाद ४५ अशी झाली होती. पाकिस्तानने इंग्लंडच्या तीन विकेट्स लवकर मिळवल्या.त्यामुळे, पाकिस्तानच्या संघाला आशा होती.पण त्यानंतर बेन स्टोक्स आणि हॅरी ब्रुक्स यांनी संघाचा डाव सावरला. पाकिस्तानच्या विजयात बेन स्टोक्स हा मोठा अडसर दिसत होता. स्टोक्सने यावेळी अर्धशतक पूर्ण केले. बेन स्टोक्सने नाबाद ५२ धावांची खेळी साकारली आणि संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडने यावेळी ५ विकेट्स राखून विश्व चषक जिंकला.
पाकिस्तानची पहिली फलंदाजी असली तरी, त्यांना यावेळी जास्त चमक दाखवता आली नाही. कारण पाकिस्तानला पहिला धक्का हा मोहम्मद रिझवानच्या रुपात बसला. रिझवान आतापर्यंत चांगल्या फॉर्मात होता. पण या सामन्यात त्याला सॅम करनने १५ धावांवर बाद केले आणि पाकिस्तानला पहिला धक्का दिला.पाकिस्तानला हा पहिला धक्का चांगलाच महागात पडला. ही विकेट पडल्यावर पाकिस्तानचे फलंदाज एकामागून एक बाद होत गेले. रिझवाननंतर हारिस बाद झाला आणि पाकिस्तानला दुसरा धक्का बसला.पाकिस्तानला यावेळी सर्वात जास्त अपेक्षा कर्णधार बाबर आझमकडून होत्या, कारण बाबर चांगल्या फॉर्मात होता, त्याच्याकडे चांगला अनुभवही होता. पण बाबरने यावेळी आपल्या चाहत्यांची निराशा केली. कारण बाबरही यावेळी ३२ धावांवर बाद झाला व पाकिस्तानला मोठा धक्का बसला. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशिदने आपल्याच गोलंदाजीवर झेल पकडत त्याला बाद केले. कर्णधार बाबर बाद झाल्यावर शान मसूदने पाकिस्तानचा डाव सावरण्याचा चांगला प्रयत्न केला.शानने यावेळी २८ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३८ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून ही सर्वाधिक धावांची खेळी ठरली. पण शानला यावेळी दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळाली नाही. शादाब खानने २० धावा केल्या खऱ्या, पण तेवढ्या या परिस्थितीत पुरेशा नव्हत्या. त्यामुळेच पाकिस्तानच्या संघाला या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि त्यांना १३७ धावांवर समाधान मानावे लागले.
इंग्लंडकडून यावेळी सॅम करनने सर्वाधिक तीन विकेट्स मिळवल्या, तर आदिल रशिद आणि ख्रिस जॉर्डन यांनी दोन विकेट्स मिळवत त्याला चांगली साथ दिली. तसेच बेन स्टोक्स यावेळी एक विकेट मिळवण्यात यशस्वी ठरला. एकंदरीत, पाकिस्तान वर मात करत इंग्लंडचा संघ हा यावेळी क्रिकेटच्या जगतात वर्ल्ड चॅम्पियन ठरला.
—————————————————————————