महत्वाच्या बातम्या

विद्यार्थ्यांनी विविध कायदे जाणून घेऊन त्यांचे पालन करावे – न्यायाधीश यु.एम.पाटील

सांगोला :

 विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांचा वापर करताना काळजी घेणे आवश्यक असून चुकीच्या पोस्ट व चुकीच्या प्रतिक्रिया देणे हे प्रकर्षाने टाळावे.तसेच विद्यार्थ्यांनी विविध कायदे जाणून घेऊन त्यांचे पालन करावे, असे आवाहन सांगोला येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायमूर्ती यु.एम.पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या कायदेविषयक शिबिरात केले.

      सांगोला येथील रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित, शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज व सांगोला तालुका विधी सेवा संघ यांचे संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सांगोला येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायमूर्ती यु.एम.पाटील हे बोलत होते. या शिबीराच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड हे उपस्थित होते. यासमयी, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन व सरस्वती पूजनाने शिबिराची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड व प्राचार्य डॉ.आर.ए. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी न्यायमूर्ती यु.एम.पाटील यांनी, समाजामध्ये वाढणाऱ्या सायबर क्राईमविषयी माहिती देऊन विविध गुन्ह्यांमधील शिक्षेच्या तरतुदी विषयी विद्यार्थ्यांना अवगत केले. याप्रसंगी,संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी राज्य घटनेतील मूलभूत हक्क व कर्तव्य समजून घेऊन त्यांचे पालन करावे जेणेकरून सुसंस्कृत व सुशिक्षित समाज निर्माण होईल. सदर शिबिरात अँड.विजयसिंह चव्हाण, अँड.ए.जे.बनसोडे व अँड.एस.व्ही.बोत्रे यांनी भारताचे संविधान, करियर आणि कंपनी कायदे तसेच जमीन विषयक कायद्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कायदेविषयक शिबिरास अँड.संजीवनी खांडेकर, अँड. ए.एस.लवटे, अँड.एच.एस.घोंगडे, अँड.सी.व्ही.बनकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगोला विधीज्ञ संघाचे अध्यक्ष अँड.डी.जी.मेटकरी यांनी केले. तर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.पी.सी. चव्हाण यांनी केले.सदर कायदेविषयक शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button