सांगोला :
पावसाळ्यात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने सद्य:परिस्थितीत संपूर्ण सांगोला तालुक्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे.यामुळे तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांनाही वनवण फिरावे लागत आहे.विहीरींच्या पाण्याने तळ गाठला आहे.तसेच ज्या गावांना पिण्याच्या पाण्याच्या पाण्यासाठीच्या योजना आहेत,त्या सुध्दा नित्याने चालत नाहीत.कांही गावांमध्ये सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत.परंतु त्यास मर्यादा असल्याने सांगोला तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर ताबडतोब योग्य त्या उपाययोजना कराव्यात,असे निवेदन शेकापच्या वतीने पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाॅ.बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काल मंगळवारी तहसीलदार संतोष कणसे यांना देण्यात आले असून सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पालकमंत्री, जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत.
पावसाच्या अनियमितपणामुळे व कमी प्रमाणामुळे शेती व्यवसाय पुर्णतः अडचणीत आला असून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात दूध व्यवसायाकडे वळाला असल्याने सांगोला तालुक्यात पशुधनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.पर्जन्याअभावी पशुधन जगवण्याची पशुपालकांपुढे मोठी समस्या आहे.तरी पशुधन वाचवण्यासाठी शासन पातळीवर लवकरात लवकर चाऱ्याची व्यवस्था करुन शेतकरी वर्गाला न्याय देण्यासाठी त्वरित निर्णय घेण्यात यावा.अन्यथा,येणाऱ्या काळात लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरुन जनआंदोलन करु,असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सदर निवेदन देतेवेळी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख,खरेदी विक्री संघाचे चेअरमन इंजि.रमेश जाधव,सूतगिरणीचे व्हा.चेअरमन गव्हाणे,युवा नेते दत्ता टापरे,धनगर समाज सेवा मंडळाचे दत्ता जानकर तसेच पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,विविध दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन व सदस्य,विविध संस्थेचे चेअरमन व संचालक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,अशी माहिती प्रसिध्दीप्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.
—————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक