क्राईम

आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

 

नवी दिल्ली :

दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री (सक्तवसुली संचलनालय) ईडीकडून अटक करण्यात आली.दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षणाचा दिलासा देण्यास गुरुवारी नकार दिल्यानंतर लगेच संध्याकाळी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले.तेंव्हाच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची कुणकुण लागली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरी कांहीवेळ तपास केला.त्यानंतर साधारण दोन तासांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना अटक केली.

दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली असून अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणात सुमारे नऊ वेळा समन्स बजावण्यात आले होते.मात्र,अरविंद केजरीवाल एकदाही ईडीच्या चौकशीला हजर राहिले नव्हते. अखेर गुरुवारी संध्याकाळी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले. सुरुवातीला त्यांची चौकशी होईल, असे सांगण्यात आले होते.मात्र,दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतले. ईडीच्या या कारवाईमुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ईडीच्या कारवाईनंतर आपचे कार्यकर्ते हे प्रचंड आक्रमक झाले आहेत.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना करण्यात आलेली अटक हे एक राजकीय षडयंत्र आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री पदी अरविंद केजरीवाल हेच राहतील.त्यांना तुरुंगातून सरकार चालवावे लागले तरी हरकत नाही. मात्र, मुख्यमंत्रीपदी केजरीवाल हेच राहतील. ईडीकडून अनेक धाडी टाकण्यात आल्या मात्र,त्यातून एक रुपयाही त्यांना मिळाला नाही.केवळ लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर करण्यात आलेली अटक हे एक षडयंत्र आहे. अरविंद केजरीवाल हे माणूस नाहीत,ते एक विचार आहेत, अशी प्रतिक्रिया आपच्या नेत्या आतिशी मारलेना यांनी यावेळी व्यक्त केली.
——————————————————————————

काय आहे दिल्ली मद्यघोटाळा प्रकरण ? :

* दिल्लीतील कथित दारु घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण २०२१ मध्ये सादर केलेल्या दिल्लीच्या नवीन दारु विक्री धोरणाशी संबंधित आहे (आता ते रद्द करण्यात आले आहे). केजरीवाल सरकारने २०२१ मध्ये मद्यविक्रीसाठी नवीन धोरण तयार केले होते.ज्यामध्ये कथित घोटाळ्याचा आरोप आहे.वाद वाढल्यानंतर तो रद्दही करण्यात आला.

* या धोरणात सरकारचा दारु विक्रीशी कांहीही संबंध नसून केवळ खासगी दुकानांनाच दारु विक्री करण्याची परवानगी होती. मद्याचा काळाबाजार रोखणे,महसूल वाढवणे आणि ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी हा त्याचा मुख्य उद्देश होता.मनीष सिसोदिया हे दिल्लीच्या उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख होते,त्यामुळे त्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे.

* या धोरणांतर्गत दिल्लीत मद्याची होम डिलिव्हरी आणि दुकाने पहाटे ३ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती.परवानाधारक मद्यावर अमर्यादित सूट देखील देऊ शकत होते.

* नव्या धोरणात तरुणांचे दारु पिण्याचे वयही कमी करण्यात आले.त्यावरुनही बराच गदारोळ झाला.केजरीवाल सरकार हे तरुणांना नशेच्या आहारी ढकलत असल्याचा आरोप भाजपने केला.

* दिल्ली सरकारने या धोरणातून उत्पन्नात लक्षणीय २७ टक्के वाढ नोंदवली.ज्यामुळे सुमारे ८,९०० कोटी रुपये उत्पन्न झाले.याचदरम्यान,दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आणि दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के.सक्सेना यांनी या प्रकरणात गैरप्रकार झाल्याची भीती व्यक्त केली. या धोरणाविरोधात उपराज्यपालांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.

* सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात सिसोदिया यांचे नांव अद्याप आलेले नाही,परंतु गेल्या वर्षी सीबीआयने त्यांच्या घरासह ३१ ठिकाणी छापे टाकले आणि त्यांना अटक करण्यात आली.या प्रकरणी यापूर्वीही अनेकांना अटक करण्यात आली आहे.

* सीबीआय शिवाय ईडीही या घोटाळ्याची चौकशी करत आहे.मगुंथा श्रीनिवासुलरेड्डी यांचा मुलगा मगुंथा राघव याला ईडीने अलीकडेच अटक केली आहे. ईडीचा दावा आहे की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील दारु व्यवसायासंदर्भात मागुंता श्रीनिवासुलरेड्डी यांची भेट घेतली होती.

* याआधी सीबीआयने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या कविताचे पूर्वी चार्टर्ड अकाउंटंट असलेले बुचीबाबू गोरंतला यांना अटक केली होती.तर,१२ डिसेंबर रोजी सीबीआयच्या पथकाने कविता यांची देखील हैदराबादमध्ये ७ तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली होती. कविता या दक्षिण कार्टेलचा भाग असल्याचा आरोप केंद्रीय यंत्रणेने केला होता.तसेच त्यांना मद्य धोरण प्रकरणात लाच घेतल्यामुळे फायदा झाला होता,असा आरोप आहे.

* सीबीआय एफआयआर मधील आरोपी क्रमांक एक असलेल्या सिसोदिया यांची मागील वर्षी १७ ऑक्टोबर रोजी चौकशी करण्यात आली होती. याच्या एक महिन्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले.

* सीबीआयच्या आरोपपत्रात सिसोदिया यांचे नांव नव्हते. कारण त्यावेळी सीबीआयचा इतर संशयित व आरोपींविरुद्ध तपास सुरु होता.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button